ड्रग सप्लायर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:46+5:302021-04-09T04:09:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सव्वालाखाची एमडी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सव्वालाखाची एमडी तसेच अन्य साहित्य जप्त केले. सुमेध भागवत लांडगे (वय ३७) असे आरोपीचे नाव आहे.
लांडगे पाचपावलीतील वैशालीनगरात आनंद बेकरीजवळ राहतो. तो एमडीची तस्करी करीत असल्याची कुणकुण लागल्याने पोलीस अनेक दिवसापासून त्याच्यावर पाळत ठेवून होते. लांडगे एमडीची मोठी खेप घेऊन गुरुवारी दुपारी गार्डनजवळ येणार असल्याची टीप गुन्हे शाखा पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएसचे वरिष्ठ निरीक्षक सार्थक नेहते, सहायक निरीक्षक सूरज सुरोशे, हवालदार समधान गीते, नामदेव टेकाम, विनोद गायकवाड, नितीन मिश्रा, अश्विन मांगे, राहुल गुमगावकर, समीर शेख, नितीन साळुंखे आदींनी गुरुवारी दुपारी ११.४० वाजता सापळा लावून आरोपी लांडगेला वैशालीनगर गार्डनजवळ पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १४.९ ग्राम एमडी (मेफेड्रोन) आढळले. पोलिसांनी हे १ लाख ३० हजाराचे मेफेड्रोन, मोबाईल तसेच दुचाकी असा एकूण २ लाख ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीची चाैकशी सुरू आहे.
---
तीन वर्षांपासून सक्रिय
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, लांडगे गेल्या तीन वर्षांपासून ड्रग तस्करीत सक्रिय होता. मात्र तो छोट्या प्रमाणात लपूनछपून करीत असल्याने त्याच्यावर पोलिसांची नजर गेली नव्हती. गेल्या काही दिवसापासून त्याने नेटवर्क वाढविण्याचे प्रयत्न केल्यामुळे तो पोलिसांच्या टप्प्यात आला आणि आज त्याच्या एनडीपीएस सेलने मुसक्या बांधल्या.
---