औषधाचा वापर होतोय नशेसाठी! दहा ते वीस पटीच्या किमतीने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 08:41 AM2021-05-07T08:41:50+5:302021-05-07T08:43:34+5:30
Nagpur News प्रतिबंधित औषधांची शहरात जोरात विक्री सुरू आहे. नशेसाठी याचा वापर होत असून शहरातील अनेक विक्रेते दहा ते वीस पट किंमत आकारून या औषधींची विक्री करीत आहेत.
जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिबंधित औषधांची शहरात जोरात विक्री सुरू आहे. नशेसाठी याचा वापर होत असून शहरातील अनेक विक्रेते दहा ते वीस पट किंमत आकारून या औषधींची विक्री करीत आहेत. अन्न औषध प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे सारे घडत असतानाही कारवाई मात्र कुठेच दिसत नाही. अशातच गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने पाचपावलीतील एका औषध विक्रेत्याला रंगेहात पकडल्याने हा विषय गंभीर ठरला आहे.
लॉकडाऊननंतर अनेक नशेखोर गुन्हेगार कंगाल झाले आहेत. चोरी, पाकीटमारी, फसवणूक या सारखे गुन्हे करून ही मंडळी आपली नशेखोरीची सवय पूर्ण करायची. आता एमडी अथवा गर्द खरेदी करणे आवाक्याबाहेर असल्याने ‘नर्वस सिस्टिम’ प्रभावित करणाऱ्या औषधांचा वापर त्यांच्यामध्ये वाढला आहे. ही औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय दिली जाऊ शकत नाही. मूळ प्रिस्क्रिप्शनवर आपल्या दुकानाचा शिक्का मारल्यावरच दुकानदारांना ही औषधी ग्राहकांना द्यायची असते. त्याचा हिशेबही ठेवायचा असतो. मात्र नियम बाजूला सारत शहरातील अनेक औषध विक्रेते अशा औषधींची विक्री करीत आहेत.
दहा ते २० टक्के अधिकची किंमत आकारून हा व्यवहार सुरू आहे. प्रिस्क्रिप्शनवर शिक्का मारला जात नसल्याने एकच चिठ्ठी अनेक दुकानांमध्ये वापरली जात आहे. काही गुन्हेगार तर अनेक दुकानांमधून ही औषधी खरेदी करून साथीदारांना अधिकच्या किमतीत अवैधपणे विकत आहेत. गुन्हे शाखेच्या चौकशीत ही बाब पुढे आल्यावर त्यांचेही डोके चक्रावले.
इंदौरा येथील अजय मेडिकल स्टोर्सचे संचालक अरुणकुमार राजानी विना प्रिस्क्रिप्शनने औषध विकत असल्याचे पोलिसांना कळले. यावरून एनडीपीएस सेलने एफडीएच्या मदतीने राजानी यांना रंगेहात पकडण्याची योजना आखली. बनावट ग्राहक दुकानात पाठवून औषधीची मागणी केल्यावर ती अधिकच्या किमतीने देताच पोलिसांनी कारवाई केली. कोडेन नामक ७० रुपये किमतीचे प्रतिबंधित सिरप विना प्रिस्क्रिप्शनने दुकानदाराने १५० रुपयात विकले. या दुकानातून ७ हजार रुपयांची ही औषधी जप्त करण्यात आली आहे.
नशाखोरीला मिळतोय वाव
सध्या नायट्रो टेन, अल्प्राझोलम, कोडेन सिरप या सारख्या औषधांचा वापर नशेसाठी केला जात आहे. कोरोना संक्रमणामुळे दुकानामध्ये ग्राहकांच्या रांगा असतात. औषधांच्या दुकानांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी अन्न औषध विभागातील अधिकाऱ्यांची आहे. मात्र या अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हे प्रकार घडत असल्याचा आरोप आहे. १ मे रोजी पाचपावली पोलिसांनी उबेद रजा या औषध विक्रेत्याला त्याच्या सहकाऱ्यासह रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना पकडले. मात्र तो ठाण्यातून पसार झाला. अशाच रेमडेसिवीरच्या काळाबाजारीच्या घटनेत पोलिसांनी औषध दुकानातील कर्मचारी आणि एका एमआरला पकडले होते.
...