मद्यधुंद बसचालक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:22 AM2017-11-07T00:22:49+5:302017-11-07T00:23:12+5:30
मद्यधुंद अवस्थेत परसोडीजवळ एका कंटेनरला धडक देणाºया एसटी महामंडळाच्या चालकाचे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी तातडीने निलंबन करून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मद्यधुंद अवस्थेत परसोडीजवळ एका कंटेनरला धडक देणाºया एसटी महामंडळाच्या चालकाचे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी तातडीने निलंबन करून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान या चालकाला दारू पिऊन असताना बस देणाºया आणि नियंत्रण कक्षात ड्युटीवर जाण्याची परवानगी देणाºया अशा इतर एसटी कर्मचाºयांवरही कारवाई होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली.
रविवारी सायंकाळी एसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगारातून एम. एच. १४, बी. टी. ४४११ क्रमांकाची बस घेऊन कैलाश शेळके हा चालक नांदेडकडे निघाला. तो मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे दारूच्या नशेत त्याने परसोडीजवळ एका कंटेनरला धडक दिली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत बसचालक बस सोडून फरार झाला होता. या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी बसचा चालक कैलाश शेळके याच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती एसटीच्या अधिकाºयांनी दिली.
मद्यधुंद अवस्थेत बस सोपविलीच कशी ?
बसचालक ड्युटीवर जाण्यापूर्वी वाहन निरीक्षक बसचालकास बसचा ताबा देतात. जर बसचा चालक दारू पिऊन होता तर तशा अवस्थेत गणेशपेठ आगारातील वाहन निरीक्षकाने बस त्याच्या ताब्यात कशी सोपविली हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय बस प्लॅटफार्मला लावल्यानंतर नियंत्रण कक्षात बसलेल्या नियंत्रकांच्याही हा प्रकार लक्षात आला नाही. त्यामुळे महामंडळातील निरीक्षक, नियंत्रक ड्युटी बजावतात की काय करतात ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यातील दोषी अधिकारी, कर्मचाºयांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पुण्यातील घटनेचा महामंडळाला विसर
पुण्यातील एसटी महामंडळाच्या एका बसचालकाने रस्त्यावरील नागरिकांना चिरडल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने बस आगारातून बाहेर पडताना सुरक्षा कर्मचाºयाकडून बसच्या चालकाचे ओळखपत्र, तो दारू पिऊन आहे काय याची तपासणी सुरू केली. नागपूर विभागातही ही तपासणी सुरु करण्यात आली. परंतु कालांतराने एसटी महामंडळाला या घटनेचा विसर पडल्यामुळे पुन्हा ही गंभीर घटना घडली. बस डेपोबाहेर पडताना तपासण्याची ही पद्धत सुरू असती तर मद्यधुंद अवस्थेतील बसचालक गेटवरच पकडल्या गेला असता. मात्र, काही दिवस योजना सुरू करायची आणि नंतर बंद करण्याच्या महामंडळाच्या धोरणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होणार
‘मद्यधुंद अवस्थेतील बसचालकाने कंटेनरला धडक दिल्याच्या घटनेची एसटी महामंडळाने गंभीर नोंद घेतलेली आहे. हा बसचा चालक दारू पिऊन असताना त्याला बस कशी सोपविण्यात आली, नियंत्रण कक्षातील कर्मचाºयांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करण्यात येईल. यात दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.’
- सुधीर पंचभाई, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.
एसटी बसेस बाहेर पडण्याच्या मार्गावर पूर्वी लोखंडी रॉड आडवा करून बसेसची तपासणी करण्यात येत होती. परंतु काही काळानंतर ही तपासणी बंद करून एसटी महामंडळाने बसेस बाहेर पडण्याच्या मार्गावर तैनात करण्यात आलेले सुरक्षा रक्षकही काढून घेतले आहेत. त्यामुळे रविवारी मद्यधुंद चालक बस बाहेर घेऊन जाण्यात यशस्वी झाला. बसेस अडविण्यासाठी वापरण्यात येणारा हा लोखंडी रॉडही अर्ध्यातून तुटल्याचे चित्र गणेशपेठ स्थानकावर दिसले.