आधी साॅरी; नंतर कुटुंबावर हल्ला! महिलेच्या डोक्यात फोडली बाटली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:03 AM2023-10-02T11:03:22+5:302023-10-02T11:04:32+5:30
बर्थ डे सेलिब्रेशन करताना शिवीगाळ केल्याने टोकल्याचा राग
नागपूर : शिवीगाळ केल्याच्या मुद्यावरून टोकल्याने तीन तरुणांनी एका कुटुंबावर हल्ला करत त्यांना जखमी केले. आरोपींनी कुटुंबातील एका महिलेच्या डोक्यावर बॉटल फोडून तिला जखमी केले. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.
अमरावती मार्गावरील वडधामना येथे नाइट आ?ल रेस्ट्रो अँड लॉज आहे. तेथे विक्रांत तिवारी हे त्यांचा भाऊ, वहिनी व बहिणीसह जेवणासाठी गेले होते. त्याचवेळी तेथे आरोपी कार्तिक नन्नावरे (२५), विशाल साहू (२२) व श्रेनल मेश्राम (१९) हेदेखील होते. आरोपी तिवारी यांच्या टेबलजवळ बसून हे तिघे इतर मित्रांसह वाढदिवसाची पार्टी करत होते. नशेत असलेल्या विशालने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिला आणि लहान मुले असल्याने विक्रांतच्या भावाने विशालला शिवीगाळ न करण्याची विनंती केली.
आपली चूक लक्षात आल्यानंतर विशालने 'सॉरी' म्हटले. त्यानंतर विक्रांत आणि त्याचा भाऊ जेवण करण्यात मश्गूल झाले. विशालने 'सॉरी' म्हटल्यावर कार्तिक नाराज झाला. कार्तिकने विशालला फटकारले व ‘ज्याला तू सॉरी म्हणालास त्याची लायकी तरी काय आहे’, असे म्हणत त्याने स्वत: शिवीगाळ सुरू केली. विक्रांत व त्याच्या भावाने कार्तिकला समजावून शिवीगाळ न करण्यास सांगितले. त्यामुळे कार्तिक आणि त्याचे मित्र चिडले. आरोपींनी आधी विक्रांतच्या भावावर हल्ला केला. हे पाहून विक्रांत मध्यस्थी करण्यासाठी आला. त्याच्यावरही आरोपींनी हल्ला केला.
विक्रांतच्या वहिनीच्या डोक्यात दारूच्या बाटलीने प्रहार करण्यात आले. डोक्याला जबर मार लागल्याने त्याची वहिनी गंभीर जखमी झाली. कार्तिक रॉड घेऊन विक्रांतच्या दिशेने धावला. विक्रांत तेथून बाजूला झाल्याने त्या वाराने त्याची बहीण जखमी झाली. विक्रांत, त्याचा भाऊ, वहिनी आणि बहीण जखमी झाल्याने मुलेही घाबरली. या घटनेने हॉटेलमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ते पाहून आरोपी काळ्या रंगाच्या कारमधून तेथून पळून गेले. विक्रांतच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपींविरोधात हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेल्समध्ये अवैध दारू विक्री
अमरावती रस्त्यावरील अनेक हॉटेल्स व ढाबे अराजकतेचे अड्डे बनले आहेत. येथे अवैध दारू विक्री केली जाते. पहाटेपर्यंत हॉटेल्स सुरू असतात. मात्र, पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येते.