नागपुरात मद्यपी करताहेत सॅनिटायझरची नशा : पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 08:38 PM2020-04-14T20:38:34+5:302020-04-14T20:40:17+5:30

लॉकडाऊनमुळे सर्व बार व वाईन शॉप बंद असल्याने मद्यपींनी नशेकरिता हॅन्ड सॅनिटायझरचा आधार घेतला आहे. ते जीवाची पर्वा न करता सॅनिटायझर पिऊन नशा करीत आहेत.

Drunk sanitizer in Nagpur: five accused arrested | नागपुरात मद्यपी करताहेत सॅनिटायझरची नशा : पाच आरोपींना अटक

नागपुरात मद्यपी करताहेत सॅनिटायझरची नशा : पाच आरोपींना अटक

Next
ठळक मुद्देशांतिनगर पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे सर्व बार व वाईन शॉप बंद असल्याने मद्यपींनी नशेकरिता हॅन्ड सॅनिटायझरचा आधार घेतला आहे. ते जीवाची पर्वा न करता सॅनिटायझर पिऊन नशा करीत आहेत. या प्रकरणात शांतिनगर पोलिसांनी सोमवारी रात्री सॅनिटायझर विक्रेता व चार ग्राहकांना रंगेहात पकडले.
आशू हुकूमचंद गुप्ता (३०), रा. शांतिनगर, आकाश मनोज गुप्ता (२८), रा. किल्ला रोड, महाल, सुशील बाबुराव झंझाड (२८), रा. खैरीपुरा, लालगंज, शेख अश्फाक शेख आसिफ (२५), रा. कळमना व अय्याज अली फैयाज अली (३२), रा. शांतिनगर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. आशू गुप्ता चहाचे दुकान चालवतो. लॉकडाऊनमुळे त्याचे दुकान बंद आहे. करिता, त्याने कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मद्यपींना दारुच्या नावावर सॅनिटायझर विकण्याची योजना आखली. तो देशी दारू पिणाऱ्यांना सॅनिटायझरमध्ये ७० टक्के अल्कोहोल असल्याची माहिती देत होता. तसेच, सॅनिटायझरचे काहीच दुष्परिणाम नसल्याचे सांगत होता आणि २५० मि.ली. ची सॅनिटायझरची बॉटल २०० रुपयांत विकत होता. त्याचा हा गोरखधंदा काही दिवसांपासून सुरू होता.
सोमवारी रात्री शांतिनगर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पटेल कंट्रोलच्या गल्लीत आरोपी आशू संशयास्पद स्थितीत दिसून आला. झडती घेतली असता त्याच्याकडे रॉयल अल्कोहोल हॅन्डरबच्या दोन बॉटल मिळाल्या. अन्य आरोपींनी ते आशूकडे दारु खरेदी करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आशू व अन्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर आशूच्या घराची तपासणी केली असता सॅनिटायझरच्या ४६ बॉटल व दारुची एक बॉटल असा एकूण ४ हजार ३४० रुपयाचा माल मिळाला.
शांतिनगरमध्ये देशी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दारुची दुकाने बंद असल्यामुळे मद्यपी नशेकरिता वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. त्यामुळे काहीजण नशेकरिता सॅनिटायझर विकत आहेत. हॅन्ड सॅनिटायझरमध्ये अल्कहोलसह रासायनिक पदार्थ असतात. सॅनिटायझर पिल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो. असे असताना अनेक मद्यपी नशेकरिता हॅन्ड सॅनिटायझर प्राशन करीत आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दारुबंदी कायदा, राष्ट्रीय आपत्ती कायदा व जमाव बंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई डीसीपी राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कवडू उईके, पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे, हवालदार वकील, जाधव, देवेंद्र व पंकज यांनी केली.

विशेष अभियानाची गरज
‘लोकमत’ने रेल्वेलाईनजवळच्या अवैध भट्यांमधून आरोग्यास घातक दारू विकली जात असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. लॉकडाऊनमुळे दारू मिळत नसल्यामुळे मद्यपींची अवस्था वाईट झाली आहे. देशी दारू पिणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मजूर वर्ग आहे. ते नशेकरिता प्राणघातक उपाय करीत आहेत. त्यामुळे प्राणहानीची मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही बाब लक्षात घेता पोलीस व अबकारी विभागाने विशेष मोहीम चालविणे आवश्यक झाले आहे.

Web Title: Drunk sanitizer in Nagpur: five accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.