नागपूरच्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:26 AM2019-12-19T00:26:58+5:302019-12-19T00:28:07+5:30
हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांचा कडा बंदोबस्त असताना अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत आहे. स्वत: आमदारांनी बुधवारी विधानसभेत आपबिती सांगत याबाबतची माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांचा कडा बंदोबस्त असताना अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत आहे. स्वत: आमदारांनी बुधवारी विधानसभेत आपबिती सांगत याबाबतची माहिती दिली.
अक्कलकोट येथील भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सभागृहात सांगितले की, ते आमदार निवासातील खोली क्रमांक ७७ मध्ये थांबले आहेत. मंगळवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या खोलीचे दार जोरजोराने वाजवले. दरवाजा उघडल्यावर तीन अज्ञात लोक होते. सर्व दारूच्या नशेत टुन्न होते. त्यांनी दारूसाठी पैसे नसल्याचे सांगत ५०० रुपये मागितले. नकार दिला असता पाहून घेण्याची धमकी दिली. त्यांनी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने पोलिसांना मदतीसाठी बोलावण्याचा प्रयत्न केला असता तिथे पोलीस कर्मचाऱ्यांपैकी कुणीच नव्हते. ते बाहेर आले आणि तिथे तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा त्याने पोलीस चौकीत जाण्यास सांगितले. आमदार निवासात आमदारच सुरक्षित नसल्याची टीकाही सचिन कल्याणशेट्टी यांनी केली.
त्याचप्रकारे भाजपच्याच सदस्य मंदा म्हात्रे यांनी सुद्धा १६ डिसेंबर रोजी दारुड्यांनी आमदार निवासात प्रचंड गोंधळ घातल्याचे सांगितले. आमदार निवासातून ड्रम भरून दारूच्या बॉटल निघाल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या अनेक आमदार येथे राहत नाही. त्यांचे कर्मचारी राहतात. यापैकी अनेकजण दारू पिऊन गोंधळ घालतात. महिला आमदारही सुरक्षित नाहीत.
सुरक्षेवर विशेष लक्ष देणार - अध्यक्ष नाना पटोले
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, महिला आमदरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देत महिला आमदारांच्या राहण्यासाठी एकाच फ्लोअरवर व्यवस्था करण्यात आली. ते स्वत: या विषयाकडे लक्ष देतील.