काेटा जमविण्यासाठी तळीरामांची भागमभाग : दाेन दिवसांच्या बंदीमुळे तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:01 AM2021-02-27T00:01:48+5:302021-02-27T00:04:59+5:30
Drunkards rushed for collecting quota शुक्रवारी शहरात सायंकाळच्या वेळी दारू दुकानांवर झालेली ताेबा गर्दी पाहताना लाॅकडाऊनपूर्वी आणि बंदी उठविल्यानंतरच्या आठवणी ताज्या झाल्या. महापालिका प्रशासनाने शनिवार आणि रविवार दाेन दिवस शहरात आंशिक लाॅकडाऊनची घाेषणा करताच दाेन दिवसांचा काेटा जमविण्यासाठी तळीरामांची भागमभाग सुरू झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी शहरात सायंकाळच्या वेळी दारू दुकानांवर झालेली ताेबा गर्दी पाहताना लाॅकडाऊनपूर्वी आणि बंदी उठविल्यानंतरच्या आठवणी ताज्या झाल्या. महापालिका प्रशासनाने शनिवार आणि रविवार दाेन दिवस शहरात आंशिक लाॅकडाऊनची घाेषणा करताच दाेन दिवसांचा काेटा जमविण्यासाठी तळीरामांची भागमभाग सुरू झाली. दिवसभर सार काही शांततेत सुरू हाेते पण कार्यालये संपताच सायंकाळी मदिरालयांवर गर्दी उसळली. जाे ताे दारू दुकानांकडे धाव घेताना दिसला. त्यामुळे बहुतेक दुकानांवरती अक्षरश गाेंधळाची परिस्थिती निर्माण झाली हाेती.
काहीसा उसंत दिल्यानंतर काेराेनाने पुन्हा आपले डाेके वर काढले आहे. फेब्रुवारी महिन्यात चांगलीच रुग्णवाढ व्हायला लागली आहे. आठ दिवस ६०० ते ७०० वर असलेली रुग्णसंख्या दाेन दिवसांत १००० च्या पार गेलेली आहे. आजाराचा वाढता विळखा लक्षात घेत पुन्हा लाॅकडाऊन लावावा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान महापालिका व जिल्हा प्रशासनाने संपूर्ण लाॅकडाऊनएेवजी सुटीचे दाेन दिवस म्हणजे शनिवार व रविवारी शहर बंदची घाेषणा केली. जीवनावश्यक गाेष्टी वगळता इतर सार काही बंद राहणार आहे. इतर गाेष्टींचा फार फरक पडत नसला तरी तळीरामांची दारूमुळे चांगलीच कुचंबना हाेते. त्यामुळे ही वेळ येऊ नये म्हणून आधीच व्यवस्था करण्यासाठी सारा आटापिटा चाललेला दिसला. बंदची घाेषणा दाेन दिवसांपूर्वी झाल्याने काहींनी पूर्वीच आपली व्यवस्था केली. मात्र वेळेवर बघू असा विचार करणाऱ्यांनी शुक्रवारी मद्य खरेदीसाठी दुकान गाठले. सायंकाळच्या वेळी शहरातील सर्व दारू दुकानांवर मद्यपींच्या उड्या पडल्या. बंपर, दाेन बंपर घरी नेऊन दाेन दिवस मनसाेक्त तहान भागवावी, यासाठी सारा प्रयत्न हाेता. दरम्यान गर्दीमुळे दुकानदार व तेथील कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले.
दुकानासमाेरील बॅरिकेड तुटले
दाेन दिवसांच्या बंदीमुळे दुकानात गर्दी हाेइल, हे निश्चित हाेते. त्यामुळे काही दारू दुकानदारांनी समाेर बॅरिकेडही लावले हाेते. दिवसभर ते शाबूत राहिले पण सायंकाळी या बॅरिकेडचे तीनतेरा वाजले. दुकानांवर मद्यपींच्या अक्षरश उड्या पडल्या आणि क्षणात बॅरिकेड माेडले गेले. गर्दी सांभाळताना दुकानदारांची तारांबळ झाली. रात्री ९ वाजताचा वेळ जवळ येताच दुकानांवर गाेंधळाचा माहाेल दिसून आला.
इ-पेमेंटच्या नकाराने ग्राहकांची धावपळ
दरम्यान दारू विक्रीत वेळ लागू नये म्हणून दुकानदारांनी दुपारपासूनच इ-पेमेंट व कार्ड पेमेंटची सुविधा बंद करून टाकली. केवळ राेख रकमेने दारू देण्याच्या निर्णयाने ऑनलाइन पेमेंटला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांची अडचण झाली. एेनवेळी दारू घेण्यास गेलेल्यांना तर चांगलीच धावपळ करावी लागली. वेळेवर एटीएमचा शाेध घेत पैसे काढून त्यांनी दारू घेण्याचा आटापिटा केला.
ब्लॅकने विक्री करणाऱ्यांची चांदी
दरम्यान दाेन दिवसांची संचारबंदी लक्षात घेता ब्लॅकने दारू विक्रेत्यांनीही दाेन दिवस अवैध विक्रीची व्यवस्था करून ठेवल्याचे दिसले. अनेकांनी दिवसा अधिकचा साठा करून ठेवला असून बंदीच्या दिवसात हा माल बाहेर काढण्यात येइल. उल्लेखनीय म्हणजे लाॅकडाऊनच्या काळात अवैध विक्रेत्यांनी चार ते पाचपट किमतीने मद्य विक्री केली हाेती. यावेळी दुपटीने तरी विक्री हाेण्याचा विश्वास त्यांना आहे.