नागपुरात दारुड्या वाहनचालकांवर कडक कारवाई : पाच हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 08:59 PM2019-07-26T20:59:15+5:302019-07-26T21:00:38+5:30
वेळोवेळी समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चार दारुड्या वाहनचालकांना मोटर वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. ३० वाहन चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आला. तर एकाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली. यानंतर पुन्हा दारूच्या नशेत वाहन चालविताना पोलीस कारवाईत सापडल्यास त्याला त्याचा वाहन चालविण्याचा परवाना नेहमीसाठी रद्द करण्याचे आदेशही न्यायालयाने दिला आहे. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर अंकूश लावण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेळोवेळी समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चार दारुड्या वाहनचालकांना मोटर वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. ३० वाहन चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आला. तर एकाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली. यानंतर पुन्हा दारूच्या नशेत वाहन चालविताना पोलीस कारवाईत सापडल्यास त्याला त्याचा वाहन चालविण्याचा परवाना नेहमीसाठी रद्द करण्याचे आदेशही न्यायालयाने दिला आहे. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर अंकूश लावण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जाते.
दारूच्या नशेत वाहन चालविल्यास हमखास अपघात होतात. त्यात अनेकदा निष्पाप व्यक्तीचा बळी जातो. अपघातामुळे संबंधितांना अनेकदा जीवघेण्या जखमा होतात. अपंगत्व येते आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास होतो. त्यामुळे दारूच्या नशेत वाहन चालवू नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून दारुड्या वाहनचालकांविरुद्ध ड्रंक न ड्राईव्हची कारवाई केली जाते. त्यात वाहनचालकांकडून जुजबी दंडाची रक्कम वसूल केली जाते. या कारवाईला अनेक वाहनचालक जुमानत नाहीत. कारवाई झाल्यानंतरही ते दारूच्या नशेत वाहन चालवितात. अशा वाहनचालकांची वाहतूक पोलिसांनी आता गंभीर दखल घेतली आहे. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी वारंवार ड्रंक न ड्राईव्हच्या (डीडी) कारवाईत सापडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करता यावी यासाठी या कारवाईचा अहवाल अद्ययावत करून घेतला आहे. त्यानुसार, एकापेक्षा जास्त वेळा डीडीच्या कारवाईत सापडलेल्यांची माहिती तात्काळ वाहतूक शाखेच्या संगणकात उपलब्ध होते. हा अहवाल संबंधित वाहनचालकांच्या विरोधात कोर्ट कारवाईच्या दरम्यान भक्कम पुरावा ठरतो. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांनी सीताबर्डीत दारुड्या वाहनचालकांविरुद्ध डीडीची विशेष मोहीम राबविली. शहरातील सर्व परिमंडळात डीडीच्या कारवाईत वारंवार दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर पुराव्यासह मोटर वाहन न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. त्यासबंधाने निकाल देताना मोटर वाहन न्यायालयाचे न्या. शहजाद परवेज यांनी वेळोवेळी समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चार वाहनचालकांना मोटर वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.
३० वाहन चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आला. तर, एकाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली. यानंतर पुन्हा दारूच्या नशेत वाहन चालविताना पोलीस कारवाईत सापडल्यास त्याचा वाहन चालविण्याचा परवाना नेहमीसाठी रद्द करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
परिवहन विभागालाही माहिती
वारंवार डीडीची कारवाई आणि न्यायालयातून शिक्षा ठोठावूनही दारुडे वाहनचालक जुमानत नसेल तर अशा वाहनचालकाचा वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) नेहमीसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाला कळवावी, असेही या आदेशात न्यायालयाने नमूद केले आहे.
सावधान, कारवाईचा धडाका सुरूच : उपायुक्त पंडित
दारूच्या नशेत वाहन चालविणे किंवा वारंवार वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २९२८ वाहनचालकांचे परवाने निलंबित करावे, असे प्रस्ताव गेल्या सात महिन्यात वाहतूक पोलिसांनी परिवहन विभागाकडे पाठविले आहे. त्यापैकी १५८ जणांचे परवाने विशिष्ट मुदतीसाठी निलंबित करण्यात आले असून, आणखी अनेक जणांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापुढे कारवाईचा धडाका असाच सुरू राहील,अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली आहे.