आमदार निवासातील दारुड्यांचा पुन्हा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:46 PM2019-12-20T23:46:41+5:302019-12-20T23:47:48+5:30
अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या आमदार निवासामध्ये दारुड्यांची दहशत आहे. शुक्रवारी महिला आमदारांनी याची माहिती दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला गांभीर्याने घेत सरकारने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या आमदार निवासामध्ये दारुड्यांची दहशत आहे. शुक्रवारी महिला आमदारांनी याची माहिती दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला गांभीर्याने घेत सरकारने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर कारवाई करण्याची घोषणा केली.
भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी शुक्रवारी विधानसभेत माहिती देताना सांगितले की, गुरुवारी रात्री जवळपास २० ते २२ युवकांनी दारू पिऊन आमदार निवासात गोंधळ घातला. यादरम्यान पोलीस कर्मचारी मोबाईल पाहण्यात व्यस्त होते. ते या विषयावर गंभीर नव्हते. यामुळे महिला आमदारांमुळे भीतीचे वातावरण असून त्या येथे राहायला तयार नाहीत. दोन दिवसांपूर्वी सुद्धा अशी घटना झाल्याचे त्यांनी सभागृहच्या निदर्शनास आणून दिले.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयाला गंभीरतेने घेतले. ते म्हणाले, महिला आमदार दुसऱ्यांदा अशा प्रकारची तकार करीत आहेत. तेव्हा तेथील सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्याचे निर्देश त्यांनी अगोदरच दिले होते. तरीही समस्या कायम आहे. तेव्हा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशा सूचना केल्या. यावर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करण्याचे जाहीर केले.