तरुणांमध्ये वाढतोय ‘ड्राय आय सिंड्रोम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:51 AM2019-04-08T10:51:06+5:302019-04-08T10:52:33+5:30
जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत नसतील तर तो एक आजार आहे. अश्रू न येण्याच्या म्हणजेच डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. यालाच ‘ड्राय आय सिंड्रोम’ असे म्हटले जाते. हा आजार युवकांमध्ये वाढत आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अश्रू म्हणजे आपल्या भावनांचं प्रतीक! कधी दुखावलो गेलो की डोळ्यात टचकन अश्रू बाहेर पडतात तर कधी अत्यानंद झाला की आनंदाश्रू येतात. पण जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत नसतील तर तो एक आजार आहे. अश्रू न येण्याच्या म्हणजेच डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. यालाच ‘ड्राय आय सिंड्रोम’ असे म्हटले जाते. हा आजार युवकांमध्ये वाढत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणकाच्या अतिवापरामुळे हा आजार बळावत आहे. मेडिकलच्या नेत्र रोग विभागात रोज येणाऱ्या रुग्णांमध्ये दोन ते तीन टक्के रुग्ण हे डोळे कोरडे होण्याच्या समस्येवर उपचारासाठी येत आहेत.
वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होते म्हणून वृद्धांमध्ये आणि रजोनिवृत्तीमुळे स्त्रियांमध्ये हा आजार दिसून येतो. या शिवाय, मधुमेह, उच्चरक्तदाब, रक्त पातळ करण्याच्या औषध घेणाऱ्या रुग्णांमध्येही ‘ड्राय आय सिंड्रोम’चा धोका असतो. परंतु आता सर्वच वयोगटांतील विशेषत: तरुण-तरुणींमध्ये ही समस्या प्रकर्षाने समोर येत असल्याचे मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले. ते म्हणाले, डोळे कोरडे होण्याच्या समस्येचे मुख्य कारण, म्हणजे पापण्याही लवू न देता सतत संगणक आणि स्मार्टफोन स्क्र ीनकडे एकटक पाहत राहणे. या क्रियेत पापण्या लवणंच होत नाही. संगणकाचा वापर करताना मिनिटाला १० ते १५ वेळा पापण्या मिचकावणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दुसरे म्हणजे, जास्तीतजास्त वेळ वातानुकूलित खोलीत घालविणे हेही एक कारण आहे. यामुळे डोळ्यात पाणी थांबत नाही. सतत डोळे वाहत असतात. यामुळे डोळे कोरडे पडतात. ही या आजाराची लक्षणे आहेत.
कॉण्टॅक्ट लेन्सेस व डोळ्यांचा मेकअप कारणीभूत
शासकीय असो की खासगी नोकऱ्यांमध्ये अनेकाना संगणकावर डोळे लावून बसावेच लागते. असे लोक डोळ्यांच्या समस्येने त्रस्त असतात. डोळे कोरडे होण्याच्या काही कारणांमध्ये स्वयंप्रतिकार रोग तसेच अॅण्टिस्टॅमिना आणि अॅण्टिडप्रेसंट गोळ्यांचा वापर या गोष्टी कारणीभूत असतात. कोरड्या आणि वादळी हवामानामुळेही डोळे कोरडे होतात. कॉण्टॅक्ट लेन्सेस आणि डोळ्यांच्या मेकअपसाठी कारणीभूत आहेच. सकाळी उठल्यावर डोळ्यात जळजळणे हे मुख्य लक्षण आहे. याशिवाय खाज येणे, कधी कधी अंधुक दिसणे, डोळ्यातून पाणी बाहेर येणे डोळे कोरडे होण्याच्या समस्येला हा प्रतिसाद असतो. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये कोरड्या डोळ्यांच्या पृष्ठभागावर उघड्या नसांवर सूक्ष्म कणनिर्मिती होऊन डोळ्यात एकदम खुपल्यासारख्या वेदना होऊ शकतात. बाहेरून फिरून आले की डोळे लाल होणे आणि नंतर आपोआप बरे होणे हा या आजाराचा ‘माईल्ड’ प्रकार आहे. ‘ड्राय आय सिंड्रोम’ची ही अगदी सुरु वातीची स्टेज, जी अनेकांमध्ये दिसते, असेही डॉ. मदान यांनी सांगितले.