युवकांमध्ये वाढतोय ‘ड्राय आय सिंड्रोम’
By Admin | Published: July 18, 2015 03:12 AM2015-07-18T03:12:17+5:302015-07-18T03:12:17+5:30
अश्रू म्हणजे आपल्या भावनांचे प्रतीक! कधी दुखावलो गेलो की डोळ्यात चटकन अश्रू बाहेर पडतात तर कधी अत्यानंद झाला की आनंदाश्रू येतात.
सुमेध वाघमारे नागपूर
अश्रू म्हणजे आपल्या भावनांचे प्रतीक! कधी दुखावलो गेलो की डोळ्यात चटकन अश्रू बाहेर पडतात तर कधी अत्यानंद झाला की आनंदाश्रू येतात. पण जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत नसतील तर हा एक आजार आहे. अश्रू न येण्याच्या म्हणजेच डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. यालाच ‘ड्राय आय सिंड्रोम’ असं म्हटलं जातं. हा आजार युवकांमध्ये वाढत आहे. स्मार्टफोन आणि संगणकाच्या अतिवापरामुळे हा आजार बळावत आहे. यावर उपाय म्हणून संगणकाच्या स्क्रीनवर ‘पापण्या मिचकवा’ हे स्टिकर लावण्याचा उपाय नेत्ररोग तज्ज्ञ देत आहेत.
मेडिकलच्या नेत्र रोग विभागात २५० वर रुग्ण येतात. यात २०-२५ रुग्ण हे डोळे कोरडे होण्याच्या समस्येने त्रस्त असतात. या विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, यात युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होते म्हणून वृद्धांमध्ये आणि रजोनिवृत्तीमुळे स्त्रियांमध्ये ही समस्या नॉर्मल आहे. परंतु आता सर्वच वयोगटांतील विशेषत: तरुण-तरुणींमध्ये ही समस्या प्रकर्षाने समोर येत आहे.
डोळे कोरडे होण्याच्या समस्येचे मुख्य कारण, म्हणजे पापण्याही लवू न देता सतत संगणक आणि स्मार्टफोन स्क्र ीनकडे एकटक पाहत राहणं. या क्रियेत पापण्या लवणंच होत नाही. संगणकाचा वापर करताना मिनिटाला १० ते १५ वेळा पापण्या मिचकावणं आवश्यक आहे.