नागपुरात वाहनांचे ‘ड्राय वॉशिंग’; २२ लाख लिटर पाणी वाचवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:45 AM2019-07-20T10:45:26+5:302019-07-20T10:46:48+5:30
रविवार २१ जुलैपासून विदर्भातील सर्व ऑटोमोबाईल डीलर्सला ग्राहकांच्या वाहनांची धुलाई पाण्याऐवजी ‘ड्राय वॉशिंग’ तंत्रज्ञानाने करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती ‘वादा’चे अध्यक्ष आशिष काळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा विदर्भात निर्माण झालेल्या भीषण जलसंकटाला तोंड देण्यासाठी ‘विदर्भ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (वादा)’ने वाहनांच्या धुलाईसाठी नव्या तंत्राचा वापर करण्याची तयारी दर्शवली असून, रविवार २१ जुलैपासून विदर्भातील सर्व ऑटोमोबाईल डीलर्सला ग्राहकांच्या वाहनांची धुलाई पाण्याऐवजी ‘ड्राय वॉशिंग’ तंत्रज्ञानाने करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती ‘वादा’चे अध्यक्ष आशिष काळे यांनी पत्रपरिषदेत दिली. या अभियानाला देशभरात पसरविण्याची तयारी राष्ट्रीय पातळीवरील असोसिएशनने दर्शवली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
शहरात ऑटोमोबाईल्सचे ५० वर्कशॉप्स असून, या वर्कशॉपमध्ये दरदिवसाला ६०० चारचाकी आणि तीन हजारावर दुचाकींची धुलाई केली जाते. साधारणत: प्रत्येक गाडीच्या धुलाईला १५० ते १६० लिटर पाणी खर्च होत असते. धुलाईसाठी वापरण्यात येणाऱ्या ७० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत असला तरी ३० टक्के पाणी वायाच जाते. संपूर्ण जून महिना पाण्याविना गेला आणि जुलैमध्ये सुद्धा पावसाचे चित्र दिसत नाही. अशा स्थितीत स्थानिक प्रशासनाला हातभार लावण्यासाठी आम्ही या अभियानाची सुरुवात करत असल्याचे काळे म्हणाले. ‘ड्राय वॉशिंग’मध्ये वाहनाच्या धुलाईस केवळ दोन ते तीन लिटर पाण्याचाच वापर होतो.
मात्र, यात ३५ टक्के खर्च वाढतो. महिनाभर ग्राहकांकडून हा खर्च वसूल केला जाणार नाही. पाणी टंचाईच्या काळात महिनाभर हा उपक्रम राबविणार असून, त्यानंतर नागरिकांना स्वेच्छेने या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.
या अभियानातून महिनाभरात शहरातील २२ लाख लिटर पाण्याची बचत केली जाणार असल्याचे आशिष काळे म्हणाले. ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन’चाही अध्यक्ष या नात्याने या उपक्रमास देशभरात घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी, ‘वादा’चे सचिव अनुज पांडे, उपाध्यक्ष आंचल गांधी व सहसचिव पंकज मल्होत्रा उपस्थित होते.