आधारकार्डमुळे झाली १० वर्षानंतर तरुणाची कुटुंबियांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:35+5:302021-07-11T04:07:35+5:30
नागपूर : ८ वर्ष वयाचा बेपत्ता झालेला एक मुलगा आधार कार्डच्या आधारे १० वर्षानंतर कुटुंबात परतला. तो मध्यप्रदेशातील जबलपूर ...
नागपूर : ८ वर्ष वयाचा बेपत्ता झालेला एक मुलगा आधार कार्डच्या आधारे १० वर्षानंतर कुटुंबात परतला. तो मध्यप्रदेशातील जबलपूर येथील असून, मानसिक दृष्ट्या अशक्त आहे. तो नागपुरात एका कुटुंबासोबत राहत होता.
२०११ मध्ये तो बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्या कुटुंबियांनी त्याची आधार नोंदणी केली होती. याच आधारे तो त्याच्या कुटुंबियासी भेटू शकला. गेली १० वर्ष तो नागपुरातील समर्थ दामले यांच्या कुटुंबासोबत राहत होता. दामले हे पंचशीलनगरात एक अनाथालय चालवित होते. परंतु २०१५ मध्ये ते बंद पडले. दामले यांनी सांगितले की त्याला रेल्वे स्टेशनवर भटकत असताना पोलीस अनाथालयात घेवून आले होते. तो मानसिकदृष्ट्या असमर्थ होता, काही सांगूही शकत नव्हता. परंतु तो अम्मा अम्मा म्हणत असल्याने आम्ही त्याचे नाव अमन ठेवले होते. २०१५ पर्यंत तो अनाथालयातच राहला. अनाथालय बंद पडल्यामुळे त्याची देखभाल करण्यास कुणीच नसल्याने आम्ही त्याला घरी आणले. तेव्हापासून तो आमच्या कुटुंबासोबत राहतो. मलाही एक मुलगा आणि मुलगी असल्याचे समर्थ म्हणाले.
- आधारच्या नोंदणीमुळे मिळाली दिशा
दामले यांनी सांगितले की अमनला जवळच्याच शाळेत दाखल केले होते. तो सद्या दहावीत शिकतो आहे. शाळेला त्याच्या आधार कार्डची माहिती हवी होती. त्यामुळे आम्ही त्याच्या नावाने आधार नोंदणी करण्यास मानकापूरच्या आधार केंद्रात गेलो. त्या केंद्र चालकाने सांगितले की याची पहिलेच आधार नोंदणी झाली आहे व त्याचे खरे नाव मोहम्मद आमीर आहे. त्याच आधाराने त्याच्या कुटुंबियासोबत भेट घडवून आणली.
- अमन व आमीरची फोटो एकच
मानकापूर आधार केंद्राचे व्यवस्थापक अनिल मराठे यांनी सांगितले की दामले त्यांच्याकडे ३ जून रोजी अमनचे आधारकार्ड बनविण्यासाठी आले होते. परंतु अमनचे आधार कार्ड २०११ मध्ये जबलपूरमध्ये बनले होते. अमन व आमीरचे फोटो मॅच करून बघितले. दोघांचाही फोटो एकच असल्याने, दामले यांच्या परवानगीने जबलपूर येथे मित्राच्या माध्यमातून अमनच्या कुटुंबियांचा शोध घेणे सुरू केले. अमनचे कुटुंबिय जबलपूर येथे खाद्यपदार्थाची दुकान चालवितात. त्यांनी दामले यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रक्रिया पार पाडली. ३० जून रोजी ते अमनला घेवून गेले.