संविधानाशी निष्ठा सोडल्यानेच नक्षलवादाचा प्रश्न

By admin | Published: February 20, 2017 02:17 AM2017-02-20T02:17:18+5:302017-02-20T02:17:18+5:30

हिंसेला हिंसेने उत्तर दिल्याने प्रश्न सुटत नाही, हे खरे आहे. एकीकडे नक्षलवाद्यांना लोकशाही व्यवस्था व संविधान मान्य नाही.

Due to abandoning loyalty to the Constitution, question of Naxalism | संविधानाशी निष्ठा सोडल्यानेच नक्षलवादाचा प्रश्न

संविधानाशी निष्ठा सोडल्यानेच नक्षलवादाचा प्रश्न

Next

ई. झेड. खोब्रागडे : भूमकाल संघटनेतर्फे व्याख्यानमाला
नागपूर : हिंसेला हिंसेने उत्तर दिल्याने प्रश्न सुटत नाही, हे खरे आहे. एकीकडे नक्षलवाद्यांना लोकशाही व्यवस्था व संविधान मान्य नाही. दुसरीकडे सरकार व सरकारी यंत्रणा संविधानाची अंमलबजावणी योग्यरीतीने करीत नाही. सरकारी व्यवस्था व नक्षलवादी शोषित वंचिताच्या बाजूने नाहीत. दोन्ही घटकांनी संविधानावरील निष्ठा सोडल्याने नक्षलवादाचा प्रश्न अधिक चिघळत असल्याचे मत माजी सनदी अधिकारी व विचारवंत ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
भूमकाल संघटनेच्यावतीने ‘प्रजासत्ताक भारतीय संविधानासमोरील नक्षलवादाचे आव्हान’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. हर्ष जगझाप, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. धनराज डहाट आदी मान्यवर उपस्थित होते. ई. झेड. खोब्रागडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांचे दाखले देत या प्रश्नावर प्रकाश टाकला. १३ राज्यांतील २३२ जिल्ह्यांत नक्षलवादाचा प्रभाव आहे. नक्षलवाद्यांना आदिवासी प्रश्नांशी देणे-घेणे नाही. त्यांना बॅलेटऐवजी बुलेटचा वापर करून सत्ता मिळवायची आहे. दुसरीकडे सरकारी व्यवस्था आदिवासींना माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाही. या लोकांबद्दल आस्था व प्रेम नसल्याने न्याय्य हक्कापासून वंचित ठेवल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात आजही ४० टक्के अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. नक्षलवादाच्या नावाने प्रभावित क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व शासकीय यंत्रणेवर कोट्यवधींचा खर्च केला जातो. कोटींचा निधी पुरविला जातो. मात्र तेथील आदिवासी लोकांना थोडासाही लाभ मिळत नाही. उलट नेता, ठेकेदार, प्रशासनातील अधिकारी, पोलीस व शेवटी नक्षलवादी यांच्यामध्ये तो वाटला जातो. त्यामुळे नक्षलवाद संपावा, असे वाटत नाही. म्हणूनच आदिवासी समाजाला नक्षलवादी आणि सरकारी व्यवस्थाही जवळची वाटत नसल्याची खंत खोब्रागडे यांनी व्यक्त केली. संविधानाला न मानणारी नक्षलवादी चळवळ अतिरेकी आणि राष्ट्रविघातक असल्याचे सांगत संवादाने ही समस्या सोडविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
डॉ. हर्ष जगझाप यांनी जातीव्यवस्थेमुळे देशातील इतर समस्यांप्रमाणे नक्षलवादाची समस्या निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले. जातीव्यवस्थेमुळे विशिष्ट जातीजवळ असलेले भांडवल त्यांच्याच जातीत खेळविले जाते. समान विभागणी नसल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत नाही. अशा व्यवस्थेतून नक्षलवादाचा जन्म होतो. त्यामुळे त्यांचे प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या बंदुकीला बंदुकीने उत्तर देणे योग्य नाही. जेव्हा संघर्ष हिंसेच्या पातळीवर येतो तेव्हा प्रश्न सोडविणे अनिश्चित होते.
नक्षलवादाकडे भारताच्या परिवर्तनाचे उत्तर नाही तर बुद्ध तत्त्वज्ञानात ते आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी संवाद हा महत्त्वाचा असल्याचे मत डॉ. जगझाप यांनी व्यक्त केले. डॉ. धनराज डहाट यांनी लोकशाही व्यवस्थेत सामान्य माणसांना न्याय मिळत नसेल तर काही देशविघातक शक्ती नक्षलवादाचे निमित्त करून त्याचा फायदा घेत असल्याचे मत व्यक्त केले.
विनोबा विचार केंद्र येथे आयोजित व्याख्यानमाला व चर्चासत्राचे संचालन डॉ. श्रीकांत भोवते यांनी केले तर प्रास्ताविक भूमकाल संघटनेचे अध्यक्ष अरविंद सोहनी यांनी केले.(प्रतिनिधी)

Web Title: Due to abandoning loyalty to the Constitution, question of Naxalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.