प्रशासनाच्या मनमानीमुळे नागपूरची विकास कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 09:29 PM2018-09-27T21:29:36+5:302018-09-27T21:30:31+5:30
बिकट आर्थिक परिस्थिती व महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरातील विकास कामे गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प आहेत. फाईल रोखल्याने नगरसेवकांत प्रचंड नाराजी आहे. विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी आयुक्तांना निवेदन देऊ न निधी उपलब्ध करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिकट आर्थिक परिस्थिती व महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरातील विकास कामे गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प आहेत. फाईल रोखल्याने नगरसेवकांत प्रचंड नाराजी आहे. विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी आयुक्तांना निवेदन देऊ न निधी उपलब्ध करण्याची मागणी केली.
स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. सभागृहाने याला मंजुरी दिली. परंतु आयुक्तांनी अर्थसंकल्पाला मंजुरी देतानाच फाईल मंजुरीवर निर्बंध घातले. सुरुवातीला काही दिवस महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या अधिकारातील विकास निधीतील फाईल मंजूर करण्याचे धोरण स्वीकारले. परंतु काही दिवसातच महापौर व उपमहापौरांच्या कोट्यातील निधी वितरणावर निर्बंध लावले.
दुसरीकडे नगरसेवकांचा रोष विचारात घेता प्रभागातील विकास कामे करता यावी, या हेतूने स्थायी समिती अध्यक्षांनी नगरसेवकांच्या आवश्यक विकास कामांच्या फाईल मंजूर केल्या. स्थायी समितीक डून मंजुरी मिळत असली तरी निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने फाईल प्रलंबित ठेवल्या. यावर नाराज नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने तातडीच्या कामांना निधी उपलब्ध करण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले. प्रशासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. महापालिका मुख्यालयात नगरसेवक स्वत: फाईल घेऊ न फिरत असल्याचे चित्र आहे.
नगरसेवकांनी प्रभागातील विकास कामांच्या फाईल तयार करून त्यावर कनिष्ठ अभियंता, उपायुक्त यांच्याकडून मंजुरी घेतली. मात्र अतिरिक्त आयुक्त व प्रभारी आयुक्तांकडून प्रस्ताव मंजूर करण्याला नकार मिळत आहे. फक्त काही वजनदार पदाधिकारी व नगरसेवकांच्या फाईल मंजूर केल्या जात आहेत.
काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन
प्रभागातील विकास कामांसाठी निधी मंजुरीचे स्थायी समिती अध्यक्षांनी पत्र दिले आहे. परंतु त्यानंतरही प्रशासनाकडून फाईल रोखल्या जात आहेत. यामुळे विकास कामे ठप्प असल्याने विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नगरसेवकांनी गुरुवारी आयुक्तांना निवेदन दिले. अधिकाऱ्यांकडून फाईल रोखण्याचा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी केली.