एककल्ली राजकारणामुळे विदर्भाचा विषय बाजूला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:00 PM2018-05-02T20:00:10+5:302018-05-02T20:00:21+5:30
सध्या दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे एककल्ली राजकारण सुरू आहे. ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विषय बाजूला पडला आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे एककल्ली राजकारण सुरू आहे. ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विषय बाजूला पडला आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.
‘विष्णूजी कि रसोई’ येथे विदर्भ कनेक्टद्वारे आयोजित विदर्भाचा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, भाजपचे नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वेगळ्या विदर्भाबाबतच्या भूमिकेबाबत शंका नाही पण, दिल्लीच्या राजकारणाचीस्थिती अशी आहे की मोदी आणि शहा हे भाजपाच्या कुठल्याही नेत्याचे ऐकत नाहीत. या स्थितीत गडकरी आणि फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भासाठी कितीही आग्रह धरला तरी मोदी-शहा जोडी त्याकडे लक्ष देणार नाही. कारण काही का असेना पण भाजपाने विदर्भाचे वेगळे राज्य देण्याचे आपले आश्वासन पाळले नाही ही वस्तुस्थिती आहे. पण त्यामुळे काँग्रेस विदर्भाचे वेगळे राज्य देईल, अशी आशा करणे चूक आहे. याबाबत काँग्रेसने आधीच आपली फसवणूक केली आहे. त्यामुळे विदर्भातील कोणताही पक्ष वेगळ्या विदर्भासाठी आपल्याला मदत करेल या भरोशावर राहण्यात काही अर्थ नाही. विदर्भवादी संघटनांना स्वत:ची राजकीय शक्ती निर्माण करून, विदर्भ राज्य पक्ष निर्माण करूनच विदर्भ राज्य मिळेल, हे लक्षात घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागावे असे प्रतिपादन अॅड. श्रीहरी अणे यांनी केले.
प्रास्ताविक अॅड. मुकेश समर्थ यांनी केले. संदेश सिंगलकर, तेजिंदरसिंग रेणू, दिनेश नायडू, विष्णू मनोहर, माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, अॅड. स्मिता सिंगलकर, हरिभाऊ केदार, प्रफुल्ल मनोहर, मिलिंद देशकर, अॅड. तुषार मंडलेकर, अॅड. चंद्रकांत समर्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अनिल अहीरकर, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी, चंचलसिंग रेणू, अॅड. नीरज खांदेवाले, दुर्गाप्रसाद अग्रवाल, अॅड. शैलेंद्र हारोडे, अॅड.सुरेंद्र पारधी, अॅड. नंदा पराते, डॉ. उदय बोधनकर, धनंजय धार्मिक, नितीन रोंघे, दिलीप नरवाडिया, प्रदीप महेश्वरी, अण्णाजी राजेधर, माजी आमदार यादवराव देवगडे, रवी संन्याल, श्रीनिवास खांदेवाले, प्रा. रिना शहा आदी उपस्थित होते.