ऑटो व इंजिनिअरिंग क्लस्टरमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:25 AM2020-12-14T04:25:43+5:302020-12-14T04:25:43+5:30
- क्लस्टर वर्षभरात प्रत्यक्ष सुरू होणार : एमआयडीसीमध्ये लघु व मोठे उद्योग येणार नागपूर : वर्षभरात सुरू प्रत्यक्ष सुरू ...
- क्लस्टर वर्षभरात प्रत्यक्ष सुरू होणार : एमआयडीसीमध्ये लघु व मोठे उद्योग येणार
नागपूर : वर्षभरात सुरू प्रत्यक्ष सुरू होणाऱ्या नागपूर ऑटो आणि इंजिनिअरिंग क्लस्टरमुळे हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वरसह अन्य औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योगांना ‘बूस्ट’ मिळणार आहे. एमएसई-सीडीपी योजनेंतर्गत एमएसएमई मंत्रालय, भारत सरकारने ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर, नागपूरमध्ये सामायिक सुविधा केंद्राच्या (सीएफसी) स्थापनेसाठी मंजुरी प्रदान केली आहे.
क्लस्टरमध्ये ७१६ सूक्ष्म व लघु उद्योगांचा सहभाग
विदर्भातील पहिल्या क्लस्टरने एमआयडीसी हिंगणा व बुटीबोरीला बूस्ट मिळेल आणि रोजगारासह गुंतवणूक वाढेल. क्लस्टरमध्ये एकूण ७१६ सूक्ष्म आणि लघु उद्योगांचा सहभाग आहे. यामध्ये महिन्द्र अॅण्ड महिन्द्र, अशोक लेलँड, ऑर्डनन्स फॅक्टरी (नागपूर, चंद्रपूर, भंडारा), बोईंग, एमआरओ, डिसॉल्ट आदींसह अनेक मोठ्या उद्योगांकडून कंत्राट मिळालेल्या लघु उद्योगांना येथे जॉब करता येतील. या क्लस्टरमध्ये विविध उद्योगांद्वारे फॅब्रिकेशन, स्टील फर्निचर, एसपीएम ऑटो पार्ट आणि इंजिनिअरिंग उत्पादने, इलेक्ट्रिक इंजिन सेवा, मशीन, शीट धातू, नियंत्रण पॅनल येथे बनविता येतील. या केंद्रातील सुविधांमध्ये सीएनसी टर्मिनल सेंटर, व्हीएमसी-५ अॅक्सिस, वायर कट मशीन, लेझर कटिंग मशीन, टेस्टिंग लॅक, डिझाईन व डिझाईन प्रशिक्षण केंद्राचा समावेश राहील. याद्वारे उद्योगांना कमी रकमेत उच्च गुणवत्तेची सेवा मिळणार असल्याचे क्लस्टरचे संचालक नारायण गुप्ता यांनी सांगितले.
असे आहे क्लस्टर
सामायिक सुविधा केंद्रासाठी २०१३ मध्ये नागपूर ऑटो अॅण्ड इंजिनिअरिंग क्लस्टर प्रा.लि. या कंपनीची स्थापना केली. क्लस्टरमध्ये १७.६३ कोटींची गुुंतवणूक होणार आहे. यामध्ये एकूण २४ जण असून, त्यात ९ संचालक आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी १० टक्के संचालकांनी गुंतवणूक केली आहे. यामध्ये १२.५ कोटींची मशीनरी केंद्र सरकार देणार असून, ३.५ कोटी राज्य सरकार आणि उर्वरित वाटा संचालकांचा आहे. क्लस्टरसाठी एमआयडीसीकडून दीड एकर जागा संचालकांनी खरेदी केली आहे. या जागेवर आठ महिन्यात इमारत उभी राहणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून १२ ते १५ मोठ्या मशीन बसविण्यात येणार आहेत.
एमएसई उद्योगात होणार वाढ
नारायण गुप्ता म्हणाले, क्लस्टरमध्ये सीएफसी स्थापनेने उद्योगात वाढ होईल. उत्पादकता, उलाढाल, रोजगार, निर्यात आणि उद्योगांची संख्या वाढेल. वार्षिक उत्पादकता ७ हजार मेट्रिक टनावरून ८,०५० मेट्रिक टनावर जाईल. तसेच क्लस्टर उलाढाल १३० कोटींवरून १६३ कोटींपर्यंत वाढेल. शिवाय प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारात वाढ होईल आणि कंपन्यांची संख्या ८५९ वर जाईल. सर्व ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टरच्या उद्योगांना जागतिकस्तरावर स्पर्धेत उतरण्यासह सीएफसीचा फायदा मिळेल. कारखान्यात मोठ्या मशीन्स ठेवू न शकणाऱ्या लघु उद्योगांना क्लस्टरमध्ये जाऊन जॉबवर्क करता येईल. त्यामुळे मोठ्या कंपन्या येथील लघु उद्योगांना काम देतील. असे क्लस्टर मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे आहे.
ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टरचे भूमिपूजन
एमआयडीसी हिंगणा येथील सीएफसीचा शिलान्यास आणि भूमिपूजन रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. समीर मेघे, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक अशोक धर्माधिकारी, एमएसएमई-डीआय नागपूरचे संचालक प्रशांत पार्लेवार, केंद्राचे संचालक नारायण गुप्ता, रमेश पटेल आणि उद्योगांचे संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.