बाबासाहेबांमुळे अशी मिळाली फ्री शीप आणि स्कॉलरशीप
By admin | Published: April 14, 2017 03:06 AM2017-04-14T03:06:07+5:302017-04-14T03:06:07+5:30
अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीसह एकूणच मागासवर्गीय विद्यार्थी फ्री शीप आणि स्कॉलरशीप घेऊन आपले ,
शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी भरावे लागले होते शुल्क
नागपूर : अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीसह एकूणच मागासवर्गीय विद्यार्थी फ्री शीप आणि स्कॉलरशीप घेऊन आपले , कुटुंबाचे व समाजाचे भविष्य घडवीत आहेत. परंतु याची सुरुवात कशी झाली, याची माहिती मात्र किती विद्यार्थ्यांना आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आणि परिश्रमामुळेच आज करोडोे गरीब विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये चौथ्या वर्गापर्यंत शिकले. त्यावेळी अस्पृश्यांना शाळा शिकण्यासाठी शुल्क भरावे लागत होते. चौथा वर्ग पास केल्यावर जेव्हा शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी बाबासाहेबांचे वडील गेले तेव्हा त्यांना शुल्क भरल्याशिवाय दाखला देण्यात आला नाही. पुढचे शिक्षण घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला अतिशय आवश्यक होता.
बाबासाहेबांच्या वडिलांनी पूर्ण शुल्क भरले तेव्हाच त्यांना दाखला मिळाला. तसेच ‘नो ड्यू’ सर्टिफिकेट देण्यात आले. साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल येथील रजिस्टरमध्ये आजही भीमराव रामजी आंबेडकर यांच्या नावापुढे ‘नो ड्यूज’ अशी नोंद सापडते.
पैसे नसल्याने गरीब अस्पृश्य शिकू शकत नाही याची जाणीव बाबासाहेबांना होती. त्यामुळे अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांना शिक्षण शुल्क माफ असावे, तसेच पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशीप मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रज सरकारकडे पाठपुरावा केला.
या विषयाचे गांभीर्य इंग्रजांना पटवून दिले. त्यामुळे १९२८ साली इंग्रजांनी ईएमएस स्टार्ट कमिटी स्थापन केली. या समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह व्ही. बी. सोलंकी, ठक्कर बाप्पा, कॅप्टन देशपांडे यांचा समावेश होता.
या समितीने १९३२ मध्ये आपला अहवाल सादर केला. या अहवालात अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना फ्री शीप आणि चौथीनंतर स्कॉलरशीप देण्याची शिफारस करण्यात आली. पुढे १९४२ -४३ मध्ये या समितीच्या अहवालानुसार पहिल्यांदा अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना फ्री शीप व स्कॉलरशीपची सुविधा मिळाली. तेव्हा पहिल्या वेळी ११४ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. १९४८-४९ मध्ये अनुसूचीत जमातीच्या ९२ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुढाकारामुळे आज देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. (प्रतिनिधी)
कृष्णा इंगळे यांनी मिळविले ते प्रमाणपत्र
सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल शाळा प्रवेश रजिस्टरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाची नोंद ७ नोव्हेंबर १९०० अशी आहे. त्यावर नो ड्यूज असे लिहिले आहे. त्या सर्टिफिकेटची एक कॉपी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी मिळविली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध ऐतिहासिक संस्कृतिक संशोधन समितीचे सदस्य या नात्याने त्यांनी या शाळेला भेट दिली असता त्यांना हा ऐतिहासिक दस्तऐवज आढळून आला होता, हे विशेष.