बुद्धाच्या धम्मामुळेच प्रगती शक्य : ई.झेड. खोब्रागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:02 PM2018-03-12T23:02:26+5:302018-03-12T23:02:49+5:30
तथागत गौतम बुद्धांच्या धम्मामुळेच प्रगती शक्य आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आंबेडकरी समाज होय. बुद्धाचे विचार व धम्म अंगीकृत करून ते आपल्या जीवनात आचरणात आणल्यामुळेच या समाजाची ही प्रगती दिसून येते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत गौतम बुद्धांच्या धम्मामुळेच प्रगती शक्य आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आंबेडकरी समाज होय. बुद्धाचे विचार व धम्म अंगीकृत करून ते आपल्या जीवनात आचरणात आणल्यामुळेच या समाजाची ही प्रगती दिसून येते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.
प्रा. पृथ्वीराज बनसोड प्रतिष्ठानतर्फे सोमवारी लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात आयोजित प्रा. पृथ्वीराज बनसोड सम्यक स्मृती पुरस्कार अर्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार उपेंद्र शेंडे अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रकाश खरात विशेष अतिथी होते.
‘चलो बुद्ध की ओर’ अभियानांतर्गत ओबीसी तथा विमुक्त भटक्या बांधवांना बुद्ध धम्माच्या वाटेवर आणणाºया प्रा. डॉ. रमेश राठोड यांना ई.झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते यंदाचा प्रा. पृथ्वीराज बनसोड सम्यक स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. १० हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह, शाल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.
ई.झेड. खोब्रागडे म्हणाले, समाजात प्रामाणिकपणे काम करणारे अनेक हिरो असतात पण ते नेहमीच पडद्यामागे असतात. रमेश राठोड हा असाच एक हिरो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम ते करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. प्रकाश खरात यांनी आंबेडकरी चळवळीवर प्रकाश टाकला. या चळवळीला १०० वर्षे पूर्ण होत असून त्याचे मूल्यमापन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपेंद्र शेंडे यांनी आपल्या अध्यक्षी भाषणात प्रा. पृथ्वीराज बन्सोड यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
प्रास्ताविक भीमराव वैद्य यांनी केले. अॅ. महेंद्र बनसोड यांनी मानपत्राचे वाचन केले. संचालन प्रा. योगेश मुनेश्वर यांनी केले. कवी सूर्यभान शेंडे यांनी आभार मानले.
‘चलो बुद्ध की ओर’ अभियानाला पुरस्काराची रक्कम प्रदान
आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा. रमेश राठोड म्हणाले, बुद्धाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग हा कोणत्याही धर्माला व देशाला प्रगतीपथावर नेणारा आहे. यावेळी त्यांना पुरस्कार स्वरूप मिळालेली १० हजार रुपयाची रक्कम त्यांनी ‘चलो बुद्ध की ओर’ या अभियानासाठी प्रदान केली.