लिजिंग कायद्यातील बदलांमुळे विदेशात जाणारे चलन देशातच थांबेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:12 AM2021-08-20T04:12:55+5:302021-08-20T04:12:55+5:30
नागपूर : देशात योग्य कायद्याअभावी विमानांना लीजवर देण्यासाठी चीन वा आयर्लंडला जावे लागत होते. त्यामुळे देशाचे चलन विदेशात जात ...
नागपूर : देशात योग्य कायद्याअभावी विमानांना लीजवर देण्यासाठी चीन वा आयर्लंडला जावे लागत होते. त्यामुळे देशाचे चलन विदेशात जात होते. पण आता केंद्रीय वित्त मंत्रालयाने फेब्रुवारीत कायद्यात बदल केल्याने आणि जेट सेट गो विमान कंपनीची विमान लीजची पहिली सुविधा सुरू झाल्याने विदेशी चलन देशातच थांबेल. त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. लिजिंग व्यवसायाची सुरुवात नागपूर मिहान-सेझमधून झाल्याने या व्यवसायाला प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
मिहान-सेझच्या एअर इंडिया एमआरओमध्ये जेट सेट फ्लीट आयएफएससी युनिटद्वारे पहिल्या ८०० एक्सपी विमानाच्या आयात समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी आर. विमला, ‘जेट सेट गो’च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कनिका टेकरीवाल, एअर इंडियाचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर कारखानीस, आय.आर.एसचे मुख्य आयुक्त अशोक, मिहान-सेझचे विकास आयुक्त व्ही. श्रमण, एमआरओचे महाव्यवस्थापक सत्यवीर व वरिष्ठ एअरकॉफ्ट अभियंता सुनील अरोरा, भारत सरकारच्या इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स अथॅरिटीचे (आयएफएससीए) डेव्हलपमेंट व इंटरनॅशनल रिलेशनशिप प्रमुख दिपेश शाह उपस्थित होते. एमआरओमध्ये आलेल्या सात सिटच्या विमानाचे पाण्याच्या फवाऱ्यांनी स्वागत करण्यात आले.
नितीन राऊत म्हणाले, विमानाच्या लिजिंगची सुरुवात देशात ७४ वर्षांनंतर पहिल्यादा नागपुरातून झाली आहे. जेट सेट गोच्या पुढाकाराने विमानन क्षेत्र उंच उड्डाण भरेल. नागपूरच्या आकाशातून ८० टक्के विमान जातात, पण लॅण्डिंग येथे होत नव्हती. पण आता या सुविधेमुळे शक्य होईल. आयएफएससीएमुळे विमान कंपन्यांना आता लीजकरिता बाहेर जाण्याची गरज नाही.
कुशल मॅनपॉवर व रोजगाराच्या संधी निर्माण होणार
राऊत म्हणाले, या प्रकल्पामुळे मिहानच्या विकासाला गती मिळेल आणि कुशल मॅनपॉवर तयार होईल. त्यामुळे विदर्भाची आर्थिक स्थिती मजबूत होईल व रोजगारात वाढ होईल. विकास व तंत्रज्ञानावर आधारित कोर्सेस येतील. प्रशिक्षित अभियंते तयार होतील. त्यांनी इंटर्नशिपच्या संधी मिळतील. एरोनॉटिकल अभियंत्यांसाठी आता उत्तम संधी आहेत. विभागीय आयुक्तांनी एअर क्रॉफ्ट प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. प्रशिक्षित अभियंत्यांना येथे संधी मिळेल. बी.एस्सी. एरोक्रॉफ्ट, बी.एस्सी. एव्हिएशन या सारखे डिग्री व डिप्लोमा कोर्सेस सुरू होतील.
मिहानने केवळ दोन दिवसात दिली मंजुरी
कनिका टेकरीवाल म्हणाल्या, लिजिंग प्रस्तावासाठी अन्य शहरांमध्ये विविध समस्यांचा सामना करावा लागला. पण मिहानमध्ये दोन दिवसातच मंजुरी मिळाली. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये विमानतळ नसल्याने मिहान-सेझ आणि हैदराबादसारख्या दोन जागांचा विचार केला. कारण जगात सातपैकी केवळ नागपूर आणि हैदराबाद येथील एमआरओ विमानतळसोबत जुळले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सकारात्मक धोरणाने हे शक्य झाले. आता सहा विमाने लीजवर देण्याचे निश्चित केले आहे. पुढील सहा महिन्यात आणखी दहा विमाने लीजवर देण्यात येणार आहे. कंपनीच्या ताफ्यात एकूण २८ विमाने आहेत.