बंद ‘सिम्युलेटर’मुळे एसटी चालकांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:48 AM2019-03-29T11:48:51+5:302019-03-29T11:50:51+5:30

नागपूर विभागात डिसेंबर २०१४ मध्ये सिम्युलेटर या संगणकीय चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. परंतु सलग पाच वर्षांपासून हे सिम्युलेटर एका बंद खोलीत धूळखात पडले आहे.

Due to closed 'simulator' the ST drivers have trouble in Nagpur | बंद ‘सिम्युलेटर’मुळे एसटी चालकांना मनस्ताप

बंद ‘सिम्युलेटर’मुळे एसटी चालकांना मनस्ताप

Next
ठळक मुद्देकसे मिळणार प्रशिक्षण ?उद्घाटनापासून खोलीत धूळ खात

दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाच्या चालकांच्या हातून अपघात होऊ नयेत, त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी याचे तांत्रिक ज्ञान देण्यासाठी वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाईल असोसिएशनच्या सहकार्याने एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात डिसेंबर २०१४ मध्ये सिम्युलेटर या संगणकीय चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. परंतु सलग पाच वर्षांपासून हे सिम्युलेटर एका बंद खोलीत धूळखात पडले आहे. यामुळे एसटीच्या चालकांना प्रशिक्षणासाठी पुण्याला जावे लागत आहे. यात महामंडळाचे मनुष्यबळ आणि आर्थिक नुकसान होत आहे.
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात १९ डिसेंबर २०१४ रोजी सिम्युलेटर या संगणकीय चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. विभाग नियंत्रक कार्यालयाच्या परिसरातील एका खोलीत सिम्युलेटर हे यंत्र बसविण्यात आले. उद्घाटनप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख, परिवहन सचिव डॉ. शैलेश कुमार शर्मा, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे, वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाईल असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष नितीन दोसा उपस्थित होते. उद्घाटन झाल्यापासून हे सिम्युलेटर बंद अवस्थेत एका खोलीत धूळखात पडलेले आहे. सिम्युलेटरमध्ये वाहतुकीचे नियम, वळणावर गाडी कशी चालवावी, अपघात होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती मोठ्या स्क्रीनवर देण्याची सुविधा आहे. परंतु उद्घाटन झाल्यानंतर एकाही चालकाला प्रशिक्षण न देताच हे सिम्युलेटर एका खोलीत बंद आहे. मागील पाच वर्षांपासून महामंडळाची जागा या यंत्रामुळे नाहक अडकून पडली आहे. त्यामुळे चालकांच्या हितासाठी हे सिम्युलेटर सुरु करण्याची मागणी होत आहे.

महामंडळाचे आर्थिक नुकसान
सध्या एसटी महामंडळात अपघात होऊ नये यासाठी चालकांना पुण्याला पाठवावे लागते. त्यामुळे एका चालकाला प्रशिक्षणासाठी पाठवायचे झाल्यास पाच दिवस वाया जातात. यात प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या वाहकाला प्रवास आणि निर्वाह भत्ता द्यावा लागतो. नागपुरात बसविण्यात आलेले सिम्युलेटर सुरु असते तर चालकांना पुण्याला पाठविण्याची गरज नव्हती. त्यामुळे मागील पाच वर्षात सिम्युलेटर बंद असल्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत
‘चालकांच्या प्रशिक्षणासाठी बसविण्यात आलेले सिम्युलेटर धूळखात पडून असण्यामागे अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत आहे. सिम्युलेटर बंद असल्यामुळे चालकांना प्रशिक्षणापासून वंचित रहावे लागते. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.’
-सुनील राठोड, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)

Web Title: Due to closed 'simulator' the ST drivers have trouble in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.