सीओपीडीमुळे दर १० सेंकदाला एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:59 PM2018-11-20T23:59:30+5:302018-11-21T00:05:18+5:30
‘क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टीव्ह पल्मनरी डिसीज’मुळे (सीओपीडी) दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. दर १० सेकंदाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. फुफ्फुसांच्या विकाराचे प्रमाण जगभरात चिंताजनकरीत्या वाढत आहे. श्वास घेण्यात येणारा अडथळा ही ‘सीओपीडी’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. यामुळे फुफ्फुसाचा झटका येऊ शकतो. जगभरात मृत्यू होण्याच्या कारणामध्ये सीओपीडी आजार तिसऱ्या क्रमांकावर आहे. परिणामी, या आजाराला जागरूकतेची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टीव्ह पल्मनरी डिसीज’मुळे (सीओपीडी) दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. दर १० सेकंदाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. फुफ्फुसांच्या विकाराचे प्रमाण जगभरात चिंताजनकरीत्या वाढत आहे. श्वास घेण्यात येणारा अडथळा ही ‘सीओपीडी’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. यामुळे फुफ्फुसाचा झटका येऊ शकतो. जगभरात मृत्यू होण्याच्या कारणामध्ये सीओपीडी आजार तिसऱ्या क्रमांकावर आहे. परिणामी, या आजाराला जागरूकतेची गरज आहे.
नोव्हेंबर महिन्यातील तिसरा बुधवार हा दिवस जागतिक सीओपीडी दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने श्वसनविकार तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. तज्ज्ञांच्या मते, देशात १९७१ मध्ये ‘सीओपीडी’ असलेल्या रुग्णांची संख्या ६५ लाख होती. २०१४ मध्ये यात दुपटीने वाढ झाली. एक कोटी चाळीस लाख या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली, तर अवघ्या दोन वर्षात तीन कोटी भारतीय सीओपीडी आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. नागपूर शहरात छातीरोग तज्ज्ञांची संख्या ३० च्यावर आहे. प्रत्येकांकडे रोज सुमारे १० नवीन रुग्ण येत असल्याचे गृहित धरल्यास रोज ९० रुग्णांवर उपचार होत असावेत, ही धक्कादायक आकडेवारी आहे.
फुफ्फुसाचा आजार
‘सीओपीडी’ हा एक फुप्फुसाचा आजार आहे. त्यामध्ये फुप्फुसांमध्ये हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. निदान वेळेत झाले नाही तर यामुळे श्वासाला अडथळा निर्माण होऊन त्यापासून बचाव करणे कठीण होऊन बसते. सीओपीडी हा वाढणारा आजार आहे आणि परिणामी तो जुना झाल्यास घातक ठरतो. ‘सीओपीडी’ बरा होत नाही, पण त्याच्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
घराघरातून निघणारा धूरही धोकादायक
सीओपीडी नेहमी धूम्रपान करणाऱ्यांचा आजार म्हणून ओळखला जातो. परंतु ८० टक्क्यांहून जास्त घरांमध्ये बायोमास इंधनाचा उपयोग केला जातो. घराघरातून निघणारा हा धूर सीओपीडीला कारणीभूत ठरत आहे. यात ३२ टक्के शहरी भागांमध्ये अजूनही स्टोव्हचा वापर होतो. २२ टक्के जळाऊ लाकूड तर ८ टक्के केरोसीन वापरतात. याचा धूर विशेषत: गृहिणींसाठी धोकादायक ठरत आहे.
सीओपीडीची लक्षणे
- ठसा सोबत किंवा ठसा विना खोकला असणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- श्वास घेताना घरघर किंवा सिटीसारखा आवाज येणे
- छातीमध्ये जखडणे
धूम्रपान करणऱ्यांमध्ये तिपटीने वाढतो धोका
धूम्रपान करणाऱ्यांमध्ये ‘सीओपीडी’चा धोका निर्माण करण्यामागील धोकादायक घटकांपैकी एक आहे. सातत्याने धूम्रपान करणाऱ्या चार जणांपैकी किमान एकाला ‘सीओपीडी’ होण्याचा धोका असतो. धूम्रपान करणाऱ्यांना ‘सीओपीडी’ होण्याचा धोका तिप्पट असतो, तर धूम्रपान करणाऱ्यांपैकी ४० टक्के जणांना गंभीर स्वरूपाचा दमा होतो आणि त्यातील अर्ध्याअधिक लोकांना ‘सीओपीडी’ होतो.
डॉ. अशोक अरबट
श्वसनविकार तज्ज्ञ
स्त्री-पुरुष दोघांमध्येही आजार
‘सीओपीडी’ हा आजार पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही अधिक प्रमाणात दिसून येतो. शहरी महिलांमध्ये गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये धूम्रपानाची सवय वाढू लागली आहे. परिणामी हे काळजीचे कारण बनले आहे. त्याचबरोबर हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयरोग आणि आॅस्ट्रिओ स्पोरोसिसमुळेही नंतर सीओपीडी होऊ शकतो.
डॉ. आकाश बल्की
श्वसनविकार तज्ज्ञ