कोरोनामुळे भाविकांनी बाहेरूनच घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:08+5:302021-03-13T04:11:08+5:30
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे उपराजधानीत अनेक ठिकाणी महाशिवरात्रीला शिव मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. भाविकांनी मंदिराच्या ...
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे उपराजधानीत अनेक ठिकाणी महाशिवरात्रीला शिव मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनच भगवान शंकराचे दर्शन घेऊन महाशिवरात्री उत्साहात साजरी केली. मंदिरात पहाटेच पुजारी आणि मंदिराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भगवान शंकराचा रुद्राभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिराचे पट उघडण्यात आले. भाविक सकाळीच मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. भगवान शंकराचे दर्शन घेऊन भाविकांनी कोरोनाचे संक्रमण दूर करण्यासाठी प्रार्थना केली.
मंदिराच्या बाहेरूनच दर्शन
शहरातील प्रमुख शिव मंदिरांत सकाळी अभिषेक, पूजा, आरतीनंतर मंदिराचे पट बंद करण्यात आले. त्यामुळे भाविकांनी बाहेरूनच पूजा करून दर्शन घेतले. बुधवारी येथील जागृतेश्वर मंदिर तीन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. नंदनवन येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान व शिव मंदिर समितीच्या वतीने मंदिराच्या मुख्य द्वारावर सूचना फलक लावण्यात आला होता. भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले. अयोध्यानगर येथील शिव मंदिराचे पटही बंद करण्यात आले होते.
प्राचीन शिवमंदिर, मानकापूर
मानकापूर येथील प्राचीन शिव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. परंतु कोरोनामुळे या वर्षी मंदिराचे मुख्य द्वार बंद होते. लहान दारातून भाविकांना आत प्रवेश देण्यात आला. पुरुष आणि महिलांच्या वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या. दोन्ही रांगेत सॅनिटायझर हातावर टाकून भाविकांना आत प्रवेश देण्यात आला. दर्शन झाल्यानंतर लगेच भाविकांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात येत होती. दरवर्षी होणारा महाप्रसाद या वेळी रद्द करण्यात आला.
नंदनवनमधील शिवमूर्ती दर्शनासाठी बंद
नंदनवन येथे भगवान शंकराची ५१ फुटांची भव्य मूर्ती आहे. दरवेळी येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. भाविक येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. परंतु या वेळी मुख्य द्वार बंद केल्यामुळे भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले. येथे भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
भोसलेकालीन, कल्याणेश्वर शिव मंदिरात पोहोचले भाविक
सक्करदरा तलाव येथील भोसलेकालीन शिव मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी पोहोचले. येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले. मंदिर व्यवस्थापनाने सॅनिटायझरची व्यवस्था केली होती. भाविकांना शारीरिक अंतर ठेवण्यास सांगण्यात येत होते. तेलंगखेडी येथील कल्याणेश्वर शिव मंदिरातही भाविकांनी भगवान भोलेनाथाचा दुग्धाभिषेक केला. भाविकांनी शिस्तीने दर्शन घेतले.
स्मशान घाटावर भाविकांची गर्दी
महाशिवरात्रीला स्मशान घाटावर मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. परंतु कोरोनामुळे स्मशान घाटावर या वर्षी आयोजन करण्यात आले नाही. तरीसुद्धा भाविक मोठ्या संख्येने स्मशान घाटावर दर्शनासाठी पोहोचले. भाविकांनी पूजा, आरती करून दर्शन घेतले. नेहमीसारखी गर्दी स्मशान घाटावर पाहायला मिळाली नाही.
लहान मंदिरांकडे वळले भाविक
महाशिवरात्रीला अनेक भाविकांनी मोठ्या मंदिरांऐवजी लहान मंदिरात दर्शनासाठी जाणे पसंत केले. मोठ्या मंदिरात गर्दी आणि संक्रमणाचा धोका असल्यामुळे भाविक लहान मंदिरांकडे वळले. लहान मंदिरे आणि झाडाखाली ठेवलेल्या शिवलिंगावर भाविकांनी बेलपत्र अर्पण करून दर्शन घेतले.
शिव मंदिर, सिव्हिल लाइन्स
सिव्हिल लाइन्स येथील श्री मंगलेश्वर ट्रस्टच्या शिव मंदिरात भगवान भोलेनाथाचा अभिषेक करण्यात आला. या वेळी कोरोनापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. राजेश निंबाळकर, विनोद पटोले, चंद्रकांत वासनिक, गजानन जोशी, पुजारी प्रदीप पांडे, चेतन वासनिक, अॅड. धनंजय दामले यांच्या सहयोगाने अभिषेक संपन्न झाला.
संत चांदुराम साहब मुक्तिधाम
जरीपटका येथील संत चांदुराम साहब मुक्तिधाममध्ये सकाळी ९ वाजता भगवान शंकराचा गंगाजलाने अभिषेक करण्यात आला. या वेळी ॐ नम: शिवायचा सामूहिक जप करण्यात आला. श्यामनदास तुलसवानी यांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. या वेळी श्यामनदास तुलसवानी, वीरभान तुलसवानी, मोटाराम चेलवानी, आवतराम चावला, पी.डी. केवलरामानी, मुरली महाराज, ठाकूरदास केवलरामानी, भिखचंद डेंबला, मनोहरलाल बत्रा उपस्थित होते.
खामलात भाविकांचा उत्साह
खामला व आजूबाजूच्या मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सोनेगाव येथील प्राचीन शिव मंदिर, खामला बाजार परिसरातील प्राचीन शिवालय, सिंधी कॉलनी येथील न्यू शिव मंदिर, सहकारनगर, भेंडे ले आऊट येथील रुद्रेश्वर, करुणेश्वर मंदिरात आयोजित करण्यात येणारे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. सर्व मंदिरांत सकाळी महाभिषेक करण्यात आला. धार्मिक आयोजन केले नसले तरी भाविकांनी बाहेरूनच दर्शन केले.
शिवशक्ती मंदिर, जरीपटका
जरीपटका येथील शिवशक्ती मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हवन, पूजा करण्यात आली. या वेळी संजय गोधानी, सुरेश जग्याशी, राजू सावलानी, बंटी दुदानी यांनी मुरली महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हवन, पूजा केली. या वेळी ॐ नम: शिवाय मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला.
..................