कोरोनामुळे जिल्हा न्यायालयातील कामकाजाची दोन सत्रात विभागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:36 PM2021-03-24T23:36:29+5:302021-03-24T23:37:39+5:30
Corona, divides the work of the district court कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजाची दोन सत्रात विभागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बुधवारी परिपत्रक जारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजाची दोन सत्रात विभागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बुधवारी परिपत्रक जारी करण्यात आले.
परिपत्रकानुसार, येत्या ९ एप्रिलपर्यंत पहिल्या सत्रात सकाळी १०.३० ते दुपारी १ तर, दुसऱ्या सत्रात दुपारी १.३० ते ४ या वेळेत न्यायालयीन कामकाज केले जाईल. त्यासाठी न्यायालयांची या दोन सत्रात विभागणी करण्यात आली आहे. याशिवाय सदर कालावधीत एखादा पक्षकार, वकील व साक्षिदार न्यायालयात हजर न राहिल्यास संबंधिताविरुद्ध कोणताही आदेश जारी करू नये, पुकारा झाल्याशिवाय वकील, पक्षकार, साक्षिदार व पोलीस यांनी न्यायालय कक्षात प्रवेश करू नये, कामकाज संपल्यानंतर कुणीही न्यायालय परिसरात थांबू नये आणि उपस्थिती आवश्यक आहे अशाच पक्षकार, वकील व साक्षिदारांना न्यायालय परिसरात प्रवेश देण्यात यावा असे निर्देश या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
परिपत्रकामुळे चित्र स्पष्ट झाले
जिल्हा व सत्र न्यायालयात येत्या ९ एप्रिलपर्यंत कोणत्या पद्धतीने कामकाज होईल याचे चित्र सदर परिपत्रकामुळे स्पष्ट झाले. तसेच, वकिलांच्या मनातील विविध प्रश्न दूर झाले. हे परिपत्रक तातडीने जारी व्हावे अशी मागणी जिल्हा वकील संघटनेने केली होती. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निवेदन सादर करण्यात आले होते.
ॲड. कमल सतुजा, अध्यक्ष, जिल्हा वकील संघटना.
वकील काय म्हणतात? गर्दीवर नियंत्रण आणावे
कामकाज दोन सत्रात विभागण्यात आले असले तरी गर्दी कमी झाली नाही. शारीरिक अंतराचे पालन होत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- ॲड. आर. के. तिवारी.
कडक अंमलबजावणी करावी
कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सध्या अनेकजन नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका कायम आहे.
- ॲड. समीर सोनवणे.
सुरक्षा उपाय योग्य नाही
जिल्हा व सत्र न्यायालयात सुरक्षा उपाय योग्य नाही. सॅनिटायजरची अनेक यंत्रे खराब झाली आहेत. प्रवेशद्वारांवर वकिलांचा ताप तपासला जात नाही.
- ॲड. मिर नगमान अली.