मतमोजणीमुळे कळमन्यात १०० कोटींच्या व्यवसायाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 08:14 PM2019-05-22T20:14:31+5:302019-05-22T20:51:22+5:30
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे कळमन्यातील बाजारपेठा २१ मे रोजी सायंकाळी ७ पासून २४ मे दिवसभर बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मालाची आवक २० मेपासून बंद झाली आहे. बंदीच्या तारखेपासून आवक येण्यास आणखी दोन दिवस लागणार आहे. एकूण सात दिवसांत सर्व बाजारपेठांमध्ये १०० कोटींच्या व्यवसायाला फटका बसणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे कळमन्यातील बाजारपेठा २१ मे रोजी सायंकाळी ७ पासून २४ मे दिवसभर बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मालाची आवक २० मेपासून बंद झाली आहे. बंदीच्या तारखेपासून आवक येण्यास आणखी दोन दिवस लागणार आहे. एकूण सात दिवसांत सर्व बाजारपेठांमध्ये १०० कोटींच्या व्यवसायाला फटका बसणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
व्यवसाय बंद राहिल्यामुळे बाजार समितीला महसूल मिळणार नाही. व्यापारी, अडतिये, शेतकरी, मजूर, हमाल यांच्या दररोजच्या मिळकतीवर परिणाम होणारा निर्णय शासनाने घेऊ नये. विधानसभा वा लोकसभेची मतमोजणी कळमना बाजारात न करता शहरात इतरत्र करण्याची मागणी विविध असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
भाज्या आणि कांदे-बटाट्याचे दर वाढणार
कळमन्यातील मुख्य भाजीपाला बाजारात दररोज ३०० पेक्षा जास्त ट्रकची आवक होते. स्थानिक आणि अन्य राज्यातून उत्पादक आणि व्यापारी कळमन्यात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजार बंद असल्यामुळे सर्वांनी आवक पूर्वीच बंद केली आहे. सात दिवसांत या बाजारात जवळपास १५ कोटींचा व्यवसाय ठप्प होणार आहे. याशिवाय कांदे-बटाटे बाजारात दररोज ५० ते ६० ट्रकची आवक होते. मतमोजणीच्या काळात जवळपास ३०० ट्रक येणार नाहीत. याशिवाय लसूण आणि अद्रक या कृषी उत्पादनाची आवक बंद राहील. त्यामुळे या दिवसांत स्वयंपाकघरात आवश्यक भाज्यांचे भाव वाढतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फळे बाजारावर परिणाम
आंब्याच्या सिझनमध्ये स्थानिकांकडून आणि अन्य राज्यातील शेतकऱ्यांकडून आंब्याची आवक वाढली आहे. पण मतमोजणीमुळे शेतकऱ्यांनी आवक थांबविली आहे. आवक वाढल्यामुळे आंबे किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलो होते. पण जवळपास सात दिवस आवक बंद राहिल्याने भाव १०० रुपयांवर जाण्याची शक्यता फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी व्यक्त केली.
धान्य बाजारात १५ कोटींचा व्यवसाय ठप्प होणार
संपूर्ण शहराला धान्य आणि कडधान्याचा पुरवठा करणाऱ्या धान्य बाजारात सहा ते सात दिवस शेतकरी माल आणणार नाही. या दिवसांत जवळपास १५ कोटींचा व्यवसाय ठप्प होणार आहे. शासनाने मतमोजणी मानकापूर येथील इंडोर स्टेडियममध्ये घेण्याची मागणी धान्य बाजार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अतुल सेनाड यांनी केली.
मतमोजणी न करण्याचे हायकोर्टात दिले होते आश्वासन
कळमना बाजारात धान्य, मिरची, आलू-कांदे, फळे, भाजीपाला, न्यू ग्रेन मार्केट अशा सहा प्रमुख बाजारपेठा आहेत. या बाजारपेठांमध्ये दररोज कोट्यवधींचा व्यवसाय होतो. मतमोजणीमुळे व्यवसाय प्रभावित होत असल्याच्या कारणांवरून सर्वच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कळमन्यात मतमोजणी घेऊ नये, या आशयाची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील मतमोजणी कळमना बाजारात घेण्यात येणार नाही, असे हायकोर्टात लिहून दिले होते. त्यानंतरही होणारी मतमोजणी ही व्यापारी, अडतिये आणि शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे मत फ्रूट मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश छाब्रानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. सर्वच बाजारपेठा २४ मेपर्यंत बंद राहणार आहेत. बाजारात व्यवसाय सुरळीत होण्यासाठी बंदीनंतर तीन ते चार दिवस लागणार आहे. व्यवसायात होणाऱ्या तोट्याची शासनाने भरपाई करावी, अशी मागणी छाब्रानी यांनी केली.