शेतमजुराची हिंमत बघून परतला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:20 AM2017-11-12T01:20:02+5:302017-11-12T01:21:39+5:30
विनोद चंदनराव कांबळे. ऐन तिशीतला तरुण. पोटाची खळगी भरण्यासाठी शेतमजूर म्हणूर राबायचा. कापसावर फवारणीचा शेतमालकाचा आदेश झाला अन् विनोद कामाला लागला.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विनोद चंदनराव कांबळे. ऐन तिशीतला तरुण. पोटाची खळगी भरण्यासाठी शेतमजूर म्हणूर राबायचा. कापसावर फवारणीचा शेतमालकाचा आदेश झाला अन् विनोद कामाला लागला. १५ दिवस निभावले पण १६ व्या दिवशी विषाने रंग दाखवला. विनोद कोसळला. हळूहळू विष अवघ्या शरीरात पसरायला लागले. तब्बल दीड महिना त्याने व्हेंटिलेटरवर मृत्यूशी कडवी झुंज दिली. पण, पठ्ठा जुमानत नसल्याचे पाहून मृत्यूने सपशेल पराभव पत्करला अन् विनोदला जीवनाचे दान देऊन आल्या पावली परतला. कीटकनाशक फवारणीच्या विषबाधेवर दीड महिना उपचार घेऊन मृत्यूला हुलकावणी देणारा विनोद हा पहिला सुदैवी रुग्ण ठरला आहे.
जिल्हा यवतमाळ ता. कळंब रा. आंदबोरी येथील विनोद कांबळे हा यवतमाळचे जिल्हा अधीक्षक राजू डांगे यांच्या शेतवार शेतमजूर म्हणून कामाला होता. शेतात कापसाचे पीक होते. मालकाच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून त्याने पिकांवर कीटकनाशक फवारणी सुरू केली. सलग १५ दिवस फवारणी केल्यानंतर १६ व्या दिवशी त्याला अस्वस्थ वाटू लागले. घरी त्याला पोट दुखून चक्कर आली आणि घरीच पडला. त्याला कळंब येथील इस्पितळात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी विनोदला तपासून तातडीने यवतमाळ मेडिकलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. विनोदची गंभीर प्रकृती पाहून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले. १५ दिवस उपचार केल्यानंतरही त्याची प्रकृती अत्यवस्थ होती. १६ आॅक्टोबर रोजी त्याला नागपूरच्या मेडिकलमध्ये नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. विनोद नागपूरच्या मेडिकलमध्ये आला तो व्हेंटिलेटर लावूनच. त्याला श्वास घेताच येत नव्हता. संपूर्ण शरीराव सूज आली होती. त्याचा ‘फॅट’मध्ये शिरलेले विष पुन्हा शरीरात पसरत होते. मेडिकलच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. योगेंद्र बन्सोड यांनी तत्काळ विनोदला अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. व्हेंटिलेटरवर लावून उपचाराला सुरुवात केली. विष शरीरात पसरल्याने कधीही काही होण्याचा धोका होता. डॉ. बन्सोड यांच्या नेतृत्वात अतिदक्षता विभागाचे डॉ. अर्चना अहेर, डॉ. चंद्रशेखर अतकर व डॉ.विनय मेश्राम यांनी दिवस-रात्र एक करून त्याच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष ठेवले. आवश्यकतेप्रमाणे उपचारात बदल करत गेले. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे हेही विनोदच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. तब्बल एक महिन्याच्या उपचारानंतर डॉक्टरांना यश आले. विनोद स्वत: श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागला. डॉक्टरांनी त्याचे व्हेंटिलेटर काढले. त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
शासनाने आर्थिक मदत द्यावी
विनोदचा लहान भाऊ सुभाष कांबळे म्हणाला, तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भाऊ विनोद पहिल्यांदाच बाप होणार होता. तो खूप आनंदात होता. परंतु तिकडे वहिणीला आठवा महिना लागला आणि इकडे भाऊ फवारणीमुळे रुग्णालयात दाखल झाला. विषबाधेमुळे रोज मृत्यू होत असल्याच्या बातम्या आम्ही वाचत होतो. परंतु भाऊ वाचेल ही आशा होती आणि ती सार्थ ठरली. मात्र, दीड महिना रुग्णालयात गेला. मजुरी बुडली. खायला घरात दाणा नाही. शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत केल्यास पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळेल, असेही तो म्हणाला.