सोयीबीनची आवक घटल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:09 AM2020-12-06T04:09:26+5:302020-12-06T04:09:26+5:30
- व्यवसायावर परिणाम : धानाची १० हजार पोत्यांपर्यंत आवक नागपूर : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या पिकाला फटका ...
- व्यवसायावर परिणाम : धानाची १० हजार पोत्यांपर्यंत आवक
नागपूर : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या पिकाला फटका बसल्याने कळमन्यात जानेवारीच्या अखेरपर्यंत भरपूर प्रमाणात होणारी सोयाबीनची आवक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कमी झाली आहे. दुसरीकडे धानाची आवक वाढली आहे. सोयाबीनची आवक कमी झाल्याने कळमन्यात व्यवसायावर परिणाम झाला असून व्यापारी आणि अडतियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे कमलाकर घाटोळे म्हणाले, नवरात्रीपासून सोयाबीन आवक सुरू होते. पण यावर्षी प्रारंभीपासूनच कमी होती. मुहूर्तावर शेतकऱ्यांना ४५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. माल खराब आल्याने नंतर भाव कमी झाले. तसे पाहता हमीभाव ३८६२ रुपये आहे. पण ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले. मिल मालकांना माल कमी मिळाल्याने खाद्यतेलाचे भाव वाढले. आता आवक कमी असून दर्जानुसार ३९०० ते ४२०० रुपये भाव मिळत आहेत. गेल्यावर्षीच्या २५०० पोत्यांच्या तुलनेत दररोज ७०० ते ८०० पोत्यांची आवक आहे. पुढे आणखी कमी होईल. नवीन सोयाबीन निघेपर्यंत अनेक शेतकरी भाव जास्त मिळण्याच्या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवतात. त्यामुळे सोयाबीनची आवक वर्षभर असते. सात ते आठ वर्षांपूर्वी दररोज १५ ते २० हजार पोत्यांची आवक व्हायची. तेव्हा शेतकऱ्यांना एकरी १५ ते २० क्विंटल सोयाबीन व्हायचे. पण आता ते दिवस गेले आहेत.
घाटोळे म्हणाले, सध्या धान बाजारात येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुसळधार पाऊस आणि किडीमुळे फटका बसला आहे. अनेक शेतकरी अटींची पूर्तता न झाल्याने शासनाच्या सेंटरवर माल न नेता कळमन्यात आणत आहेत. त्यामुळे त्यांना ५०० रुपये बोनसला मुकावे लागत आहे. कळमन्यात सध्या दररोज ९ ते १० हजार पोत्यांची आवक आहे. हमी भाव १८६५ रुपये आहे, पण शेतकऱ्यांना २ हजार ते २४०० रुपये भाव मिळत आहे.
फेब्रुवारीमध्ये गहू आणि मार्च महिन्यात तूर कळमन्यात विक्रीसाठी येणार आहे. तसे पाच ते सहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत प्रत्येक कृषी मालाची आवक कमी-कमी होत आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. अनेक शेतकरी खुल्या बाजारात माल विक्रीसाठी नेत असल्याचा फटका व्यापारी आणि अडतियांना बसत आहे. हीच स्थिती राहिल्यास दुसरा व्यवसाय शोधावा लागेल, असे घाटोळे यांनी स्पष्ट केले.