५० कोटींच्या थकबाकीमुळे नागपुरातील शहर बस सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:21 PM2018-09-22T15:21:43+5:302018-09-22T15:29:36+5:30
नागपूर महापालिका प्रशासनाने ५० कोटींची थकीत रक्कम न दिल्याने रेड बस आॅपरेटरने शनिवारी अचानक संप पुकारल्याने शहर बस सेवा ठप्प झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेने गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली ग्रन बस सेवा थकबाकीमुळे महिना भरापूर्वी बंद पडली. त्याच वेळी रेड बसच्या आॅपरेटरने ५० कोटींची थकीत न मिळाल्यास शहर बस सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने याची दखल न घेतल्याने रेड बस आॅपरेटरने शनिवारी अचानक संप पुकारल्याने शहर बस सेवा ठप्प झाली आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात ३२० बसेस धावतात. यातून दररोज १ लाख ६५ हजार प्रवासी प्रवास करतात. शहर बस बंद असल्याचा फायदा घेत आॅटो चालक मनमानी भाडे वसूल करून प्रवाशांना वेठिस धरत आहेत. तसेच टॅक्सीसाठी जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर रोष व्यक्त केला. रेड बस आॅपरेटर, ग्रीन बस आॅपरेटर व डिम्ट्स यांचे परिवहन विभागाकडे ५० कोटी थकीत आहे. मागील सहा महिन्यापासून आॅपरेटरला बील मिळालेले नाही. त्यामुळे डिझेलसाठी पैसे नसल्याने आॅपरेटरने बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
आॅगस्ट महिन्यात काही रक्कम आॅपरेटला देण्यात आली होती. उर्वरित रक्कम तातडीने देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही बीलाची रक्कम न मिळाल्याने आॅपरेटने बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.
तिकीटाचा पैसा अन्यत्र वळविला
बस तिकीटाच्या माध्यमातून दर महिन्याला महापालिकेच्या तिजोरीत ६ कोटींचा महसूल जमा होतो. किमान ही रक्कम परिवहन विभागाच्या खात्यात वळती केली असती आॅपरेटरची अर्धी थकबाकी देता आली असती. नियोजनचा अभाव असल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.