परीक्षेपासून वंचित ठेवल्याने मुख्याध्यापकासह दोघे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 09:32 PM2019-04-25T21:32:40+5:302019-04-25T21:34:28+5:30
नवोदयमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकासह दोघांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला. हा प्रस्ताव आठ दिवसापासून सामान्य प्रशासनात अडकून असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदयमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकासह दोघांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला. हा प्रस्ताव आठ दिवसापासून सामान्य प्रशासनात अडकून असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
नवोदयमध्ये प्रवेशासाठी पूर्वपरीक्षा होते. या करिता धानला येथील एका शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केला. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज केला. या अर्जासाठी येथील शिक्षिकेने ७० ते ८० रुपये विद्यार्थ्यांकडून घेतले. वेळेत प्रवेशपत्रही दिले नाही. प्रवेशपत्र मागण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी पालकांना घेऊन येण्याच्या सूचना केल्या. परीक्षेच्या दिवशी शिक्षिकेचा मोबाईल बंद होता. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान यामुळे झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रकार उपस्थित करीत चौकशीचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी संबंधित मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षिका यांच्याकडून खुलासा मागविला. खुलासा असमाधानकारक असल्याने दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला. आठ दिवसापूर्वीच हा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आला नाही.