‘एस्मा’ मुळे सहा महिने आंदोलनाला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:19 AM2018-02-23T00:19:06+5:302018-02-23T00:21:09+5:30
एस्मा कायद्यानुसार बडतर्फ करण्यासोबतच गैरहजर दिवसाच्या आठपट दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच पुढील सहा महिने एस्मा कायम असल्याची माहती महापालिकेच्या परिवहन विभागातील अधिकारी योगेश लुंगे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा)च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानंतरही दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यत कर्मचारी कामावर परतले नव्हते. अखेर गुरुवारी चालक-वाहक कामावर आले. एस्मा कायद्यानुसार बडतर्फ करण्यासोबतच गैरहजर दिवसाच्या आठपट दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच पुढील सहा महिने एस्मा कायम असल्याची माहती महापालिकेच्या परिवहन विभागातील अधिकारी योगेश लुंगे यांनी दिली.
एस्मा लागू असताना संप केल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे. कारवाईच्या धास्तीने आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने गुरुवारी शहर बससेवा सुरळीत सुरू झाली. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुुरुवारी तीन आॅपरेटरच्या ३२८ तसेच २५ ग्रीन बसेस सुरू होत्या. एस्मामुळे कर्मचारी संघटनेने संप मागे घेतल्याने गुरुवारी सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. परंतु संप कालावधीतील दोन दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे. तसेच दंड आकारायचा की नाही, याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार परिवहन समिती व परिवहन व्यवस्थापक यांना आहे.
मंगळवारी शासनाने एस्मा लागू केल्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप मागे घेतल्याची घोषणा के ली होती. परंतु प्रत्यक्षात बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम ५० बसेस सुरू होत्या. ३२५ बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच महापालिकेला यामुळे ३५ लाखांचा फटका बसला. एस्मानंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक व वाहकांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच चौकशीनतंर अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत परिवहन विभागाने दिले आहेत.