खोदकामामुळे नागपुरात ६.८७ कोटींची वीज केबल खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:14 AM2018-08-29T11:14:31+5:302018-08-29T11:16:06+5:30
शहरामध्ये ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात येत आहे. सिमेंट रोड व उड्डाण पूल तयार होत आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. परंतु, या कामामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे.
कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरामध्ये ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात येत आहे. सिमेंट रोड व उड्डाण पूल तयार होत आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. परंतु, या कामामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे. मार्च-२०१७ पासून आतापर्यंत १७८ ठिकाणांवरील एकूण ६.८७ कोटी रुपयांचे वीज केबल खराब झाले आहेत. वीज वितरण फ्रेन्चायसीने भरपाईची मागणी केली असून विकास एजन्सीज त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
केबल खराब करण्याची सुरुवात १ एप्रिल रोजी भगवाननगरातून झाली. एल अॅन्ड टी कंपनीने स्मार्ट सिटी वर्क योजनेंतर्गत केलेल्या खोदकामात ३.६० लाख रुपयांचे वीज केबल पूर्णपणे खराब झाले. ३७६० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला. त्यानंतर हे प्रकार सतत सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, ओसीडब्ल्यू, रिलायन्स आदींनी खोदकाम करताना विजेचे केबल खराब केले. २०१७ मध्ये ९७ ठिकाणी वीज केबलचे नुकसान झाले.
२०१८ मध्येही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ जानेवारी रोजी नारा येथे खोदकाम करताना वीज केबल खराब केले. त्यामुळे २८ हजार ९९८ ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला व ४ लाख ७३ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले. १७ आॅगस्ट रोजी मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान लष्करीबाग येथे ३ लाख ६० हजार रुपयांचे केबल खराब करण्यात आले. त्यामुळे १० हजार ६२४ ग्राहकांची वीज बंद पडली. एसएनडीएलने या सर्व प्रकरणांची माहिती महावितरणला दिली आहे. विकास एजन्सीजना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. परंतु, त्यावर कुणीच उत्तर दिलेले नाही. सध्या केबलची तात्पुरती दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. परिणामी, कोणत्याही क्षणी वीज पुरवठा बंद होऊ शकतो. तसेच, विजेचा प्रवाह पसरून प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खोदकाम करताना नकाशा पाहिला जात नाही
कुठेही खोदकाम करताना पाईप लाईन व विजेचे केबल कुठे आहे याची माहिती घेण्यासाठी नकाशे पाहणे आवश्यक आहे. काही ठिकाणी जुनी पाईप लाईन असल्यामुळे त्याचे नकाशे उपलब्ध नाहीत. परंतु, पाईप लाईन कुठून जात आहे याची माहिती उपलब्ध आहे. दोन्ही एजन्सीजनी आपसात समन्वय ठेवल्यास नुकसान टाळले जाऊ शकते. नियमानुसार मनपा व महावितरण कंपनीला खोदकामाची माहिती देणे अनिवार्य आहे. परंतु, विकास एजन्सीज हा नियम पाळत नाही. त्यामुळे नुकसान तर होतेच, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही बळावते.
खोदकामामुळे वीज केबल खराब होत असल्याची माहिती विकास एजन्सीजसह पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना देण्यात आली आहे. कंपनीला भरपाईपेक्षा वीज केबलची जास्त चिंता आहे. खराब झालेले केबल दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. भविष्यात ब्रेकडाऊन होऊ शकतो. त्यावेळी खोदकाम करून नवीन केबल टाकावे लागतील.
- सोनल खुराणा, बिझनेस हेड, एसएनडीएल.