निर्यात वाढल्यामुळे बासमती तांदूळ महाग : १० ते २० टक्के भाववाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:33 PM2019-05-17T21:33:13+5:302019-05-17T21:34:49+5:30
यावर्षी अरब देशांमध्ये बासमती तांदळाची मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत ब्रॅण्डनुसार भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी अरब देशांमध्ये बासमती तांदळाची मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत ब्रॅण्डनुसार भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.
गेल्यावर्षी भारतातून ४० लाख टन बासमती आणि ८८.१८ लाख टन गैर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली होती. त्यापैकी इराणमध्ये २४ लाख ४० हजार टन निर्यात झाली होती. याशिवाय इराण पाकिस्तानातूनही तांदूळ आयात करतो. बासमती तांदळाची निर्यात मुख्यत्वे इराण, सौदी अरब, कुवैत, युनायटेड अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये होते. यापैकी २५ टक्के तांदूळ इराणमध्ये जातो. इराण भारताला कच्च्या तेलाची निर्यात करते. त्या बदल्यात भारताकडून ११२१ या ब्रॅण्डचा बासमती तांदूळ आयात करतो.
सध्या इराणकडून भारताला कच्च्या तेलाची निर्यात राजकीय कारणांमुळे बंद आहे. ती लोकसभा निवडणुकीनंतरच निश्चित होणार असल्याचे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. पण इराणची कच्चा तेल निर्यातीची रक्कम भारताकडे जमा आहे. त्या बदल्यात इराणने ११२१ ब्रॅण्ड तांदळाची आयात वाढविली आहे. त्यामुळेच ८४ ते ८५ रुपये किलोच्या बासमती तांदळाची किंमत ९७-९८ वर पोहोचली आहे. निर्यात होणाऱ्या बासमती तांदळाच्या अन्य ब्रॅण्डमध्ये १४०१ मध्ये ७ ते ८ रुपये आणि अन्य तांदळाची किंमत ६८ ते ७० रुपयांवरून ७५ ते ७९ रुपयांवर गेल्याची माहिती होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली.