विश्वस्तांच्या भांडणामुळे नागपुरातील प्रसिद्ध टेकडी विघ्नहर्ता संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:44 PM2018-08-25T13:44:17+5:302018-08-25T13:45:07+5:30
विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व संकटमोचन असलेला नागपूरचा टेकडी गणपती सध्या विश्वस्तांच्या व्यक्तिगत भांडणांमुळे संकटात सापडला आहे.
सोपान पांढरीपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व संकटमोचन असलेला नागपूरचा टेकडी गणपती सध्या विश्वस्तांच्या व्यक्तिगत भांडणांमुळे संकटात सापडला आहे.
शेकडो वर्षे जुन्या टेकडी गणपती मंडळाचा कारभार सध्या ११ सदस्यांचे विश्वस्त मंडळ बघते. विद्यमान अध्यक्ष केशवराव पडोळे व माजी अध्यक्ष लखीचंद ढोबळे यांच्यात वरचष्म्याची लढाई सुरू असून त्यामुळे वार्षिक पाच कोटी उत्पन्न असलेले हे मंदिर या दोघांच्या राजकारणाचा आखाडा बनले आहे.
केशवराव पडोळे हे नागपुरातील प्रख्यात बिल्डर व स्टार्की पॉर्इंट रेसॉर्टचे मालक आहेत. त्यांच्या बाजूने आठ विश्वस्त आहेत. लखीचंद ढोबळे हेही बिल्डर असून त्यांच्या बाजूने उर्वरित तीन सदस्य आहेत. दोन्ही गटांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून मामला सार्वजनिक न्यास आयुक्तांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. अनावश्यक कोर्टबाजीमुळे मंदिरातील सार्वजनिक पैशाचा चुराडा होतो आहे.
सोने खरेदी
विश्वस्त मंडळाने २२.२.२०१५ रोजी एक कोटीचे सोने स्टेट बँकेकडून घेण्याचा निर्णय घेतला पण प्रत्यक्षात ३०.३.१५ रोजी ७९ लाख रुपयांचे सोने पाटणे ज्वेलर्सकडून खरेदी केले.
अहवालात जाहिरात प्रकाशित न करता विश्वस्त मंडळाने कार्यकारिणीच्या सभेत (आमसभेत नव्हे) तीन खासगी सोनारांकडून निविदा मागवली व त्यातील पाटणे ज्वेलर्सची निविदा मंजूर केली. यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यावर पडोळे गटाचे असे म्हणणे आहे की, स्टेट बँकेने सोन्याची लगड विकण्यास नकार दिल्याने खासगी सोनारांकडून सोने घेतले. पण निविदा का बोलावल्या नाहीत व सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाण काय यावर पडोळे यांचेकडे उत्तर नाही.
कुळकर्णी व जोगळेकर यांचे अनावश्यक प्रवास
विश्वस्त मंडळाचे सचिव श्रीराम कुळकर्णी यांनी २०१६ मध्ये काहीही कारण नसताना विमानाद्वारे मुंबईला जाणे-येणे केले. तसेच कोषाध्यक्ष संजय जोगळेकर यांनी पुणे येथे प्रवास केला. या दोन्ही प्रवासाबाबत विश्वस्त मंडळाने ठराव मंजूर केला नाही असा आक्षेप अहवालात घेतला आहे.
याबाबतीत कुळकर्णी व जोगळेकर यांनी प्रवास केल्याचे मान्य केले. टेकडी गणपती मंदिर सैन्याच्या जमिनीवर असल्याने मुंबईच्या कुलाबा कार्यालयात ही भेट द्यावी लागली असे कुळकर्णी म्हणाले. पण दोघांनीही ठराव का मंजूर केला नाही या प्रश्नावर सर्वच कामे नियमानुसार होत नसतात असे चमत्कारिक उत्तर दिले.
मोहगाव-झिल्पीच्या जमिनीवरील खर्च
मंदिराला वन विभागाकडून मोहगाव-झिल्पीजवळ पाच एकर जागा मिळाली आहे. या जागेवर मंदिराने २.५० लाख रुपयाचे बांधकाम केले पण त्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्लॅन/एस्टीमेट न करताच हा खर्च केल्याबद्दल अहवालात ठपका ठेवला आहे.
याबाबतीत पडोळे म्हणाले हे प्रकरण माझ्या पूर्वीचे अध्यक्ष कै. पुंडलिकराव जवंजाळ यांच्या कारकिर्दीत घडले आहे. भविष्यात या जागेवर आम्ही फक्त पाच लाख रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी
२८ कॅमेरे कार्यरत असताना मंदिर समितीने ४५ नवे सीसीटीव्ही कॅमेरे ४.९२ लाखात खरेदी केले. पण त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात न देता खासगी दुकानदाराकडून खरेदी केले. याबद्दल अहवालात आक्षेप घेतला आहे.
यावर पडोळे म्हणाले जुने कॅमेरे ब्लॅक अॅन्ड व्हाईट होते. नवे कॅमेरे रंगीत आहेत. पण निविदा का मागवल्या नाहीत. यावर पडोळे यांचेकडे उत्तर नव्हते.
याशिवायही इतर आरोप अहवालात आहेत. पण त्यांचे स्वरूप फारसे गंभीर नसल्याने त्याची दखल लोकमतने घेतलेली नाही. ढोबळे गटाने पडोळे व उर्वरित आठ जणांविरुद्ध सार्वजनिक न्यास आयुक्ताकडे अर्ज करून आठ सदस्यांना बेदखल करावे असा अर्ज केला आहे. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. दरम्यान पडोळे गटानेही ढोबळे गटाविरुद्ध पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आहेत.
ढोबळे गटाचे आरोप
ढोबळे गटाने एकूण १६ आरोप पडोळे गटाविरुद्ध केले असून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने त्याची चौकशी करून ११ एप्रिल २०१७ रोजी अहवाल सादर केला आहे. या अहवालातील पाच ते सहा आरोप अतिगंभीर स्वरूपाचे आहेत व त्यावर अहवालात ठपका ठेवला आहे.