नागपुरातील व्यापाऱ्याची आत्महत्या आर्थिक कोंडी झाल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:56 AM2019-02-17T00:56:38+5:302019-02-17T00:58:03+5:30
आर्थिक कोंडीत सापडलेल्या व्यापाऱ्याला ३८ लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून सहा लाख रुपये हडपणाऱ्या आणि नंतर त्याला कर्ज उपलब्ध करून न देता आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन दलालांसह १७ आरोपींविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याच्या आठ महिन्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक कोंडीत सापडलेल्या व्यापाऱ्याला ३८ लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून सहा लाख रुपये हडपणाऱ्या आणि नंतर त्याला कर्ज उपलब्ध करून न देता आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन दलालांसह १७ आरोपींविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याच्या आठ महिन्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.
शिरीष लक्ष्मणराव मोघे (वय ५१) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. ते खामल्यातील पांडे ले-आऊटमध्ये गणेश पोर्णिमा अपार्टमेंटमध्ये राहात होते. ५ जून २०१८ च्या मध्यरात्री त्यांनी गोवारी उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. मृत्युपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी बँक अधिकाऱ्यांच्या थाटात वावरणाऱ्या दलालांसह आरोपींनी आपली कशी फसवणूक केली आणि त्याचमुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे लिहून ठेवले होते. त्याचा धंतोली पोलिसांनी तपास केला. त्यातून मोघे यांना आरोपींनी तातडीने ३८ लाखांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. त्याबदल्यात सहा लाखांचे कमिशन मागितले. मोघे यांनी उधारवाडी करून आरोपींना सहा लाख रुपये दिले. मात्र, आरोपींनी मोघेंना कर्ज मिळवून न देता त्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनीआरोपी गौरव शर्मा, मॅक्स प्रॉफिट सोल्युशन, मित्तल, पी. एम. राज ग्रोवर, सिंघानिया, सोनी, तन्नू मॅडम, विक्की खुराणा, शरणवत, कक्कर, ९८२०४७४३९४ क्रमांकाचा मोबाईलधारक, सिद्धार्थ अग्रवाल, ८५०६९५२६०५चा मोबाईलधारक, स्मार्ट इन्व्हेस्ट सोल्युशन, रवी राठोड तसेच अनिल कुमार (दोघेही (बँक ऑफ बडोदाचे खातेधारक) आणि माणिक खुराणा (युनियन बँक ऑफ इंडियाचा खातेधारक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.