आगीच्या घटनेने तीन दिवस औषधांचा बाजार बंद : औषधांच्या तुटवड्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:37 PM2019-05-31T23:37:41+5:302019-05-31T23:38:23+5:30
गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ‘नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवार व शनिवार औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारी औषध बाजार सुरू होणार आहे. सलग तीन दिवस बाजार बंद राहणार असल्याने औषधांच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ‘नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवार व शनिवार औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारी औषध बाजार सुरू होणार आहे. सलग तीन दिवस बाजार बंद राहणार असल्याने औषधांच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरासोबतच संपूर्ण विदर्भाला औषधांचा पुरवठा करणारे नागपुरात ३०० हून अधिक ठोक विक्रेते आहेत. गांधीबाग येथे सुमारे १५० तर संदेश औषध बाजारातही एवढीच ठोक विक्रेत्यांची दुकाने आहेत. गुरुवारी रात्री संदेश औषध बाजाराला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. दुसऱ्या दिवशी, आग धुमसत असल्याने ‘नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवार व शनिवारी गांधीबाग औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हे ठोक विक्रेते नेहमीच्या औषधांसोबतच अवयव प्रत्यारोपण, कॅन्सर, हृदयविकारासारख्या, गंभीर व इमर्जन्सीमध्ये लागणारी औषधे उपलब्ध करून देतात. परंतु आता बाजारच बंद असल्याने याचा फटका रुग्णांना बसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अनेकांना औषधांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली होती.
औषधांचा तुटवडा पडू देणार नाही-नावंदर
महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी आगीत जळालेल्या दुकानांच्या व्यावसायिकांशी चर्चा केली. असोसिएशन तुमच्या पाठिशी असल्याचा धीरही दिला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, तीन दिवस औषधांचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार बंद राहणार असलातरी औषधांचा तुटवडा पडू देणार नाही. असोसिएशनचे पदाधिकारी यासाठी कार्यरत राहतील, अशी ग्वाहीही दिली.
दुकानांमध्ये दहा दिवसांचा साठा
किरकोळ औषध दुकानांमध्ये साधारण १०-१२ दिवसांचा औषधांचा साठा असतो. शिवाय, धंतोली, रामदासपेठ आदी ठिकाणच्या मोठ्या औषधांच्या दुकानांत सर्वच प्रकारची औषधे उपलब्ध असतात. यामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांवर कठीण प्रसंग येणार नाही. सोमवारपासून गांधीबाग औषध बाजार उघडण्याची शक्यता आहे.
हरीश गणेशानी
सदस्य, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना