गडकरींमुळे सूक्ष्म-लघु उद्योगांना येतील ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:06 AM2019-06-01T00:06:00+5:302019-06-01T00:10:02+5:30
सलग दुसऱ्यांचा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणारे नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारीदेखील देण्यात आली आहे. आजवर काहिसे दुर्लक्षित राहिलेल्या या खात्याच्या माध्यमातून गडकरी देशातील उद्योगांना एक नवीन बळ देतील. तसेच त्यांच्या कार्यशैलीतून विदर्भातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना सर्वार्थाने ‘अच्छे दिन’ आणतील, अशी अपेक्षा उद्योगजगतातून व्यक्त होत आहे. विशेषत: या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करून वंचित व गरिबांना स्वावलंबी करण्याची क्षमता गडकरींकडे आहे, असा विश्वास उद्योजकांकडूनच व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलग दुसऱ्यांचा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणारे नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारीदेखील देण्यात आली आहे. आजवर काहिसे दुर्लक्षित राहिलेल्या या खात्याच्या माध्यमातून गडकरी देशातील उद्योगांना एक नवीन बळ देतील. तसेच त्यांच्या कार्यशैलीतून विदर्भातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना सर्वार्थाने ‘अच्छे दिन’ आणतील, अशी अपेक्षा उद्योगजगतातून व्यक्त होत आहे. विशेषत: या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करून वंचित व गरिबांना स्वावलंबी करण्याची क्षमता गडकरींकडे आहे, असा विश्वास उद्योजकांकडूनच व्यक्त होत आहे.
आपल्या देशात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. सरकारी व खासगी क्षेत्रात आवश्यक प्रमाणात रोजगार उपलब्ध नाही. अशा स्थितीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे महत्त्व लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. देशाच्या आर्थिक विकासात या उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘५९ मिनिटात कर्ज’ ही योजना गाजली होती. या उद्योगांच्या माध्यमातून तरुण-तरुणींना उद्योजक बनून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी असते. या मंत्रालयाचा विस्तार आवश्यक असून नितीन गडकरी यांच्याकडे ही आव्हानात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नितीन गडकरी हे स्वत: शेतकरी असून उद्योगांबाबत त्यांचे ज्ञान पाहून भलेभलेदेखील आश्चर्यचकित होतात. गडकरी निश्चितपणे देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करतील व देशात रोजगारनिर्मितीला एक नवीन चालना मिळेल, असा विश्वास उद्योगजगतातून व्यक्त करण्यात येत आहे.
लघुउद्योग सक्षमीकरणासाठी संघ आग्रही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या सक्षमतेसाठी लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून कार्य करत आहे. देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा तसेच गरीब व्यक्ती स्वावलंबी व्हावी यासाठी या उद्योगांना प्रोत्साहन देणारे धोरण असावे, अशी संघाची भूमिका आहे. नितीन गडकरी हे संघाच्या जवळचे मानले जातात. संघाच्या अपेक्षापूर्तीसाठी पंतप्रधानांनी गडकरींवरच विश्वास ठेवला आहे.
विदर्भात मोठ्या संधी
अनेक वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विदर्भातील अनेक ‘एमआयडीसी’मध्ये आवश्यक त्या प्रमाणात मोठे उद्योग आलेलेच नाही. मात्र सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून या ‘एमआयडीसी’चा चेहरा पालटू शकतो. विदर्भात नागपूरसह वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, अमरावती इत्यादी जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गडकरी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व मिळाल्याने या उद्योगांना बळ मिळेल. मागील तीन वर्षांपासून जीएसटी लघु उद्योगांची स्थिती चांगली झाली आहे. विदर्भात पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांना काम मिळेल. नितीन गडकरी निश्चितच यासाठी पुढाकार घेतील. गडकरींचा भर ‘क्लस्टर युनिट’वर जास्त असून विदर्भात दालमिल, रेडीमेड गारमेन्ट इत्यादींचे ‘क्लस्टर’ अस्तित्वात असून ते आता भव्य होतील, असा विश्वास बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव मिलिंद कानडे यांनी व्यक्त केला.
आज नागपुरात होणार भव्य स्वागत
सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी प्रथमच उपराजधानीत आगमन होणार आहे. यानिमित्ताने सकाळी ८ वाजता नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी शहर भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी स्वागताला पोहोचावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केले आहे.
सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात नितीन मुकेश यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजता रेशीमबाग मैदान येथे नितीन गडकरी यांचा शहर व जिल्हा भाजपातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. याला खा.विकास महात्मे यांच्यासह आ.सुधाकर देशमुख, आ.विकास कुंभारे, आ.अनिल सोले, आ.गिरीश व्यास, आ.कृष्णा खोपडे, आ.मिलिंद माने, विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, महापौर नंदा जिचकार, राजेश बागडी, संदीप जोशी, प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर संघटनमंत्री भोजराज डुंबे, संदीप जाधव, रमेश भंडारी, संजय ठाकरे, किशन गावंडे, बंडू राऊत, महेंद्र राऊत, दिलीप गौर, वीरेंद्र कुकरेजा, दयाशंकर तिवारी, प्रदीप पोहाणे, डॉ. कीर्तिदा अजमेरा, धर्मपाल मेश्राम, गुड्डू त्रिवेदी, प्रमोद पेंडके, चंदन गोस्वामी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.