सोनेरी हेराफेरीने नागपुरातील तहसील ठाण्यात वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 08:57 PM2019-01-11T20:57:08+5:302019-01-11T21:03:43+5:30
तहसील पोलीस ठाण्यात घडलेल्या सोनेरी हेराफेरीच्या प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार, परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर या प्रकरणाची चौकशी करीत असून, त्यांनी या संबंधाने ‘कक्कड मामा’सह अनेकांकडे विचारपूस चालविली आहे. त्यामुळे तहसील पोलीस ठाण्यात वादळ आल्यासारखी स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तहसील पोलीस ठाण्यात घडलेल्या सोनेरी हेराफेरीच्या प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार, परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर या प्रकरणाची चौकशी करीत असून, त्यांनी या संबंधाने ‘कक्कड मामा’सह अनेकांकडे विचारपूस चालविली आहे. त्यामुळे तहसील पोलीस ठाण्यात वादळ आल्यासारखी स्थिती आहे.
३ जानेवारीला हे प्रकरण घडल्याची चर्चा आहे. सराफा व्यापाऱ्याकडून आणलेल्या चार किलो सोने सोडवण्याच्या बदल्यात मांडवली झाली. त्यानुसार, तीन किलो सोने ज्याचे त्याला परत करण्यात आले तर एक किलो सोने पोलिसांनी ठेवून घेतले. तपास अन् चौकशीच्या नावाखाली हा सर्व व्यवहार डीबी रूममध्ये झाला. ७०२२ मधून मागच्या गेटने मामाला आणण्यात आले आणि कारवाईचा धाक दाखवत त्याला मामा बनवून एक किलो सोन्याची मांडवली ‘किशोर’ने घडवून आणल्याची चर्चा आहे. किशोर हा आधीपासूनच वादग्रस्त आहे. त्याचे तहसीलच काय अनेक जुन्या साथीदारांशी पटत नाही. त्यामुळे किशोरचा हा गेम त्याच्या नव्या-जुन्या पाच साथीदारांनी वाजवला. एक किलो सोन्याची हेराफेरी झाल्याचे वृत्त व्हायरल करण्यात आल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली. या प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी लगेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस उपायुक्त माकणीकर यांनी ३ तारखेपासूनच्या पोलीस ठाण्यातील घडामोडींची बारीकसारीक चौकशी चालवली आहे. या प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी कक्कड मामासह अनेकांना विचारपूस झाली आहे. समोर आणि मागच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. त्यामुळे एक दोन दिवसातच या प्रकरणातील तथ्य समोर येण्याची शक्यता पोलीस उपायुक्त माकणीकर यांनी आज पत्रकाराशी बोलताना व्यक्त केली.
किशोर महंतची बदली रद्द
तहसील पोलीस ठाण्यात कार्यरत किशोर महंतची गुरुवारी करण्यात आलेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली. तहसील ठाण्यातून त्याची गुन्हे शाखेतील अंमली पदार्थविरोधी पथकात बदली करण्यात आली होती. मात्र, पोलीस ठाण्यातील प्रकरण वादग्रस्त ठरल्याने अनेक अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. त्यामुळे महंतच्या बदलीचा गुरुवारी काढण्यात आलेला आदेश शुक्रवारी तडकाफडकी रद्द करण्यात आला. त्याच्यासोबत अन्य दोन कर्मचाऱ्यांच्या बदलीचेही आदेश रद्द करण्यात आले. सोनेरी हेराफेरी आणि चौकशीसोबतच रद्दबातल झालेली बदली यामुळे तहसील ठाण्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.