जागतिक शुद्धलेखन दिवस; दुर्लक्षामुळे मराठी लेखनाचा दर्जा घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 08:30 PM2019-03-04T20:30:59+5:302019-03-05T11:27:44+5:30
अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करण्याचा व नियम शिथिल करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळेच मराठी भाषेच्या लेखनाचा दर्जा खालावत असल्याचे दिसून येत आहे.
निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी भाषेत व्याकरण व पर्यायाने शुद्धलेखनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करण्याचा व नियम शिथिल करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळेच मराठी भाषेच्या लेखनाचा दर्जा खालावत असल्याचे दिसून येत आहे. भाषातज्ज्ञांकडून यासंदर्भात खंत व्यक्त करण्यात येत आहे. मराठी शुद्धलेखनाचे ज्ञानकोष म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ भाषा अभ्यासक दिवाकर मोहनी यांनी लोकमतशी बोलताना विविध मुद्यांवर आपले विचार मांडले. शुद्धलेखन हे वाचकांच्या सोयीसाठी असते. लेखन नियम न जाणणारे लोक वाचनाच्या बाबतीतही पंगू असतात, असे ठाम मत त्यांनी मांडले.
शुद्धलेखनाचे नियम का आवश्यक आहेत?
आपली भाषा इतरांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत योग्य आणि शुद्ध स्वरूपात पोहचावी यासाठी शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. डोळ्यांनी वाचताना प्रत्येक शब्दाची आकृती आपल्यासमोर निर्माण होते व तो शब्द योग्य पद्धतीने लिहिला गेला असेल तर शब्दाच्या विशिष्ट अर्थाचे आकलन होण्यास त्रास होत नाही. मात्र शब्द जर चुकीच्या पद्धतीने असेल तर त्याचा अर्थ कळण्यास त्रास होतो व तो समजण्यासाठी संदर्भ शोधावे लागतात. पर्यायाने वाचनही निरस होते व त्याची गती कमी होते. लेखन हे शब्दांच्या मुळाकडे जाता येईल असे असावे.
शुद्धलेखन हे लोगोप्रमाणे
एखाद्या ब्रॅन्डचा लोगो पाहिला की आपल्याला त्या ब्रॅन्डची माहिती समजते. ‘लोकमत’ हा शब्द अनेक वर्षापासून लोकांच्या मनात आहे त्यामुळे तो तसाच वापरणे योग्य आहे. मात्र त्यात थोडाजरी बदल केला तर लोकांना चुकल्यासारखे वाटते. अक्षरांचे आणि शब्दांचेही तसे होणे आवश्यक आहे. त्या शब्दांची डोळ्यांना सवय व्हावी, तो सर्वत्र एकसारखाच लिहिला जावा. जे बघायला मिळेल ते पूर्वीपासून चालत आलेले असेल व त्यामुळे कोणत्याही काळात गेला तरी त्याचा अर्थ लोकांना त्वरित लक्षात येईल.
नियम शिथिल केल्याने समस्या सुटणार नाही
आज मराठीला अवकळा आल्याचे दु:ख व्यक्त केले जाते. ते टाळण्यासाठी व्याकरणाचे नियम दुर्लक्षिले जाणे आकलनापलीकडे असल्याचे मत दिवाकर मोहनी यांनी व्यक्त केले. २००७ साली दहावीच्या परीक्षेत मराठीमध्ये अधिक विद्यार्थी नापास झाल्याने त्यावेळी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने असाच निर्णय घेतला होता व त्यावर मोहनी यांनी आक्षेपही घेतला होता. यामुळे मुलांची आकलन क्षमता व निर्णय क्षमता कमी होईल, वाचन क्रिया निरस होईल आणि वाचनाची गती मंदावेल, पुस्तकातून वाचून विषय समजून घेण्याची क्षमताही संपून जाईल आणि गुरुमुखातून शिकविल्याशिवाय मुलांना आकलन होणार नाही. असे झाल्यास पुढच्या पिढीचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल, असे पत्र त्यांनी शिक्षण विभागाच्या संचालकांना पाठविले होते. दुर्दैवाने याची दखलच घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
अशा शिक्षकांनी विद्यार्थी कसे घडणार?
विद्यार्थ्यांमध्ये मराठीचे योग्य ज्ञान रुजविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. मात्र गुरू जर व्याकरणाच्या दुर्लक्षित परंपरेतून आले असतील तर अशा गुरूंकडून विद्याग्रहण करणे म्हणजे पोपटपंची केल्यासारखे आहे, असे परखड मत त्यांनी मांडले. शिकविणाऱ्या शिक्षकांनाच व्याकरणाचे ज्ञान नाही. अशा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांपर्यंत काय झिरपेल? यासाठी शुद्धलेखनासाठी शिक्षकांच्या कार्यशाळा घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
परकीय भाषा म्हणून शिकवावी
मराठीच्या वर्णमालेत प्रत्येक अक्षराला अर्थ आहे. केवळ ऱ्हस्व-दीर्घच नाही तर जोडाक्षरे, समास, कानामात्रा, अनुस्वार यांना विशेष अर्थ आहे. मात्र ही वर्णमाला किती लोकांना माहिती आहे, हा प्रश्नच आहे. त्यामुळे मराठीला अवकळा आली असे बोलण्यात अर्थ नाही. माझी मातृभाषा समजणारच नाही तर तिची प्रगती कशी होईल? त्यासाठी इंग्रजीप्रमाणे प्रमाण मराठी भाषा परकीय भाषा म्हणून शिकविली जावी, असे आवाहन मोहनी यांनी केले. प्राथमिक वर्गात बोलीभाषेतून शिकवत पुढच्या टप्प्यात प्रमाण मराठी शिकविण्यात यावी, असे मत त्यांनी मांडले.
संस्थांचीही उदासीनता
केवळ शासन स्तरावरच नाही तर मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांची मराठीबाबत उदासीनता आहे. बालभारतीची लेखन पद्धती ही मराठीबाबत उदासिनतेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे मोहनी म्हणाले. मराठीच्या टाईपराईटरवर जेवढे शब्द बसतात, तेवढेच वापरण्याचा त्यांचा अट्टाहास आहे. अ.भा. मराठी साहित्य महामंडळानेही वेळोवेळी व्याकरणाचे नियम बदलविण्याचा घाट घातला आहे. दुसरीकडे शासनाचा भाषा विभाग विद्यार्थ्यांना सोपे जावे म्हणून शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करण्याचे परिपत्रक काढतो. मराठीचा विकास कसा होईल, ती ज्ञानभाषा कशी होईल, यासाठी गांभीर्याने प्रयत्न केला जात नसल्याची खंत मोहनी यांनी व्यक्त केली.