अपार श्रद्धेमुळे धर्मग्रंथ न वाचण्याची परंपरा फार श्रद्धेने पाळली जाते : सुरेश द्वादशीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 09:32 PM2019-12-21T21:32:12+5:302019-12-21T21:38:09+5:30
धर्माच्या बाबतीत श्रद्धा वरचढ ठरल्या आणि तर्कांना खुजे ठरविण्यात आले. धर्मग्रंथ हे सर्वश्रेष्ठ असल्याच्या अपार श्रद्धेने धर्मग्रंथांकडे केवळ नमन करण्यासाठी बघितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धर्माच्या बाबतीत श्रद्धा वरचढ ठरल्या आणि तर्कांना खुजे ठरविण्यात आले. धर्मग्रंथ हे सर्वश्रेष्ठ असल्याच्या अपार श्रद्धेने धर्मग्रंथांकडे केवळ नमन करण्यासाठी बघितले जाते. सर्वश्रेष्ठ असल्यामुळे वाचण्याची गरजच नाही, ही परंपरा फार श्रद्धेने रूढ झाल्याचा उपहासात्मक टोला जगात अस्तित्वात असलेल्या ४२०० धर्मांच्या बाबतीत प्रख्यात कादंबरीकार व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी मारला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्रातर्फे श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात द्वादशीवार यांच्या दहा दिवसीय ‘युगांतर व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले पुष्प ‘धर्म’ या विषयावर त्यांनी गुंफले. यावेळी डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते. धर्म ही संकल्पना व्यक्ती, समाज, देश यांच्यावर अंतर्बाह्य नियंत्रण मिळविणारी यंत्रणा आहे. मात्र, ही यंत्रणा श्रद्धाव्यूहानेच पाळली जात असून, तर्कव्यूहाला तिलांजली दिली गेली आहे. तर्कामुळे श्रद्धेला शह मिळतो, म्हणूनच धर्म तर्काला दूर सारत असल्याचे द्वादशीवार म्हणाले. जगातील सर्वच धर्मग्रंथ ईश्वराने निर्माण केल्याचे मानले जाते. याच अंधश्रद्धेमुळे धर्माचे मूळ समजत नाही, प्रश्न उपस्थित करता येत नाही आणि तर्कांना चालना देता येत नाही. जगातील सर्वच धर्मांनी सत्ताधाऱ्यांनाच पाठिंबा दिला आहे. गरीब, पीडितांना कधीच पाठिंबा दिला नाही. सगळ्याच धर्मांचा जन्म झाला आहे. हिंदू धर्माची उत्पत्तीही वेदांपासून झाली आहे. त्यामुळे, धर्म सनातन ठरत नाही. पुरुष धर्म हीच संकल्पना सनातन असल्याचे मत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी यावेळी मांडले.