करवाढीवरून तापला पारा !
By admin | Published: April 21, 2015 01:55 AM2015-04-21T01:55:15+5:302015-04-21T01:55:15+5:30
ऊन तापू लागल्यामुळे शहरात पारा चढू लागला असताना सोमवारी महापालिका सभागृहातही करवाढीच्या मुद्यावरून
काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध : महापौरांच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर : ऊन तापू लागल्यामुळे शहरात पारा चढू लागला असताना सोमवारी महापालिका सभागृहातही करवाढीच्या मुद्यावरून वातावरण तापले. भाजपप्रणीत सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता करात केलेल्या वाढीविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली. गेल्या सभेत करवाढीला विरोध केला असतानाही इतिवृत्तात ‘एकमताने’ करवाढ मंजूर करीत असल्याचे कसे नमूद करण्यात आले, यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने तीव्र आक्षेप घेतला. महापौर इतिवृत्तात वारंवार ‘चिटिंग’ करीत आहेत, सदस्यांची फसवणूक करीत आहेत, असा आरोप करीत विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर येत नारेबाजी केली.
विरोधक चर्चेला तयार नव्हते
मागील सभेत करवाढीचा विषय आला तेव्हा त्यावर चर्चा न करता विरोधक सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर सभागृहात उपस्थित सदस्यांनी एकमताने विषय मंजूर केला व तेच इतिवृत्तात नमूद करण्यात आले. आता पुन्हा त्याच विषयाचा बाऊ करण्याची विरोधकांना काहीच गरज नाही. आजही विषयपत्रिकेवरील विषय पुकारले असता विरोधकांनी नामंजूर म्हटले नाही
- प्रवीण दटके, महापौर
महापौर चुका
करीत आहेत
महापौरांना सभेच्या कामकाजाच्या पद्धतीची माहिती नाही. यापूर्वीही तीन अभियंत्यांची नियुक्ती करण्याच्या विषयात महापौरांनी घोळ घातला होता. शेवटी त्यांना सभागृहाची माफी मागावी लागली होती. आता करवाढीच्या विषयावरही विरोधकांनी विरोध केला असतानाही एकमताने मंजूर केला असल्याचे इतिवृत्तात नमूद केले. महापौर चुकांवर चुका करीत असून सदस्यांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा.
- विकास ठाकरे, विरोधी पक्षनेते
...तर राष्ट्रवादी
रस्त्यावर उतरेल
सत्ताधाऱ्यांनी भरमसाट करवाढ केली आहे. नागरिक नगरसेवकांच्या घरी जाऊन जाब विचारत आहेत. लोक त्रस्त आहेत. असे सुरू राहिले तर कराच्या ओझ्याने नागरिकांवर घरे विकण्याची वेळ येईल. सत्ताधाऱ्यांनी ही करवाढ लागू करण्यापूर्वी सामाजिक संघटना व नागरिकांची मते जाणून घ्यावी. करवाढ रद्द केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
- प्रकाश गजभिये, आमदार,
राष्ट्रवादी काँग्रेस