जागा घटल्या, टक्का वाढला पीछेहाटीनंतरही काँग्रेसच्या मतात वाढ
By admin | Published: February 26, 2017 02:07 AM2017-02-26T02:07:32+5:302017-02-26T02:07:32+5:30
नागपूर महानगरपालिका निवडणुका यंदा प्रभागपद्धतीने लढण्यात आल्या होत्या. या पद्धतीमुळे पक्षांच्या मतांचे गणितच बदलले आहे.
योगेश पांडे नागपूर
नागपूर महानगरपालिका निवडणुका यंदा प्रभागपद्धतीने लढण्यात आल्या होत्या. या पद्धतीमुळे पक्षांच्या मतांचे गणितच बदलले आहे. दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसच्या मतांमध्ये मात्र चक्क वाढ झाली आहे. तर अपक्षांच्या मतांचा टक्का २०१२ च्या तुलनेत चक्क १० टक्क्यांहून अधिक घटला आहे. निवडणुकांत ‘शतक’पार जागा मिळविलेल्या भाजपाच्या मतांची टक्केवारी तर साडेनऊ टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांचा हिशेब ‘लोकमत’ने लावला असता संबंधित बाब समोर आली आहे. मागील निवडणुकांत भाजपा व कॉंग्रेसमधील मतांच्या टक्केवारीचा फरक अवघा ४.६२ टक्के इतका होता. यंदा हा फरक सुमारे १०.८० टक्के इतका झाला आहे. मागील वेळच्या तुलनेत भाजपाची आघाडी ६.१८ टक्क्यांनी वाढली.
अंतर्गत गटबाजीमुळे यंदा काँग्रेसला प्रचंड फटका बसला. २०१२ मधील ४१ वरून २०१७ मध्ये काँग्रेसच्या जागा थेट २९ वर आल्या.
जागांमध्ये घट झाली असली तरी प्रभाग पद्धतीमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांमध्ये मात्र चक्क ३.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१२ मध्ये काँग्रेसला २४.९६ टक्के मते मिळाली होती. यंदा हा आकडा २८.४० वर पोहोचला आहे.
प्रभागपद्धतीचा फायदा भाजपालाच
यंदाच्या निवडणुकांमध्ये चार जागांचा एक प्रभाग करण्यात आला होता. यावरून वाददेखील झाला होता. प्रभागपद्धतीत बदल झाल्याचा सर्वात जास्त फायदा भाजपाला झाला. जागांसोबतच भाजपाच्या मतांमध्येदेखील प्रचंड वाढ झाली आहे. जर एकट्या भाजपाला मिळालेल्या मतांकडे नजर टाकली, तर हा आकडा ३९.२० टक्के इतका आहे. २०१२ मध्ये भाजपाला २९.५८ टक्के मते मिळाली असून मतांची टक्केवारी ९.६२ टक्के इतकी वाढली आहे.
शिवसेनेचा बाण दोन टक्क्यांनी वाढला
शिवसेनेला नागपुरात अवघ्या दोनच जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्या मतांमध्ये २०१२ च्या तुलनेत २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर बसपा व राष्ट्रवादीच्या मतांमध्ये अनुक्रमे ०.६५ टक्के व ०.१८ टक्के घट झाली आहे.