बारदान्याअभावी धान खरेदी वांध्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:10 AM2021-01-20T04:10:05+5:302021-01-20T04:10:05+5:30
रामटेक : रामटेक तालुका खरेदी विक्री संघाने पणन महासंघ (फेडरेशन)च्यावतीने धान खरेदी केंद्र सुरू केले असून, या खरेदी केंद्रावर ...
रामटेक : रामटेक तालुका खरेदी विक्री संघाने पणन महासंघ (फेडरेशन)च्यावतीने धान खरेदी केंद्र सुरू केले असून, या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीनुसार धान खरेदी केली जाते. खरेदी केलेले धान भरून ठेवण्यासाठी पुरेसा बारदाना (पाेती) नसल्याने शासकीय धान खरेदी वांध्यात आली आहे.
रामटेक शहरात तालुका खरेदी विक्री संघाने धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नाेंदणी करणे अनिवार्य असल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धानाची विक्री करण्यासाठी नियमानुसार ऑनलाईन नाेंदणी केली आहे. या खरेदी केंद्रावर धानाची आधारभूती किमतीप्रमाणे म्हणजेच प्रति क्विंटल १,८६८ रुपयांप्रमाणे खरेदी केली जात असून, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपयांचा अतिरिक्त बाेनसही दिला जाताे. शासनाने या बाेनसला क्विंटलची मर्यादा ठरवून दिली आहे.
रामटेक तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यामातून चार केंद्रावर धानाची खरेदी केली जात आहे. परंतु, खरेदी केलेला धान भरून ठेवण्यासाठी पुरेसा बारदाना नसल्याने १४ जानेवारीपासून ही खरेदी थांबविण्यात आली आहे. बारदाना उपलब्ध करून द्यावा, याबाबत आपण शासनाला पत्राद्वारे कळविले आहे, अशी माहिती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गुप्ता यांनी दिली.
....
बारदाना मिळावा म्हणून आम्ही राेज शासनाकडे पाठपुरावा करीत आहाेत. लवकरात लवकर बारादाना उपलब्ध व्हावा, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. शासनाकडून बारदाना प्राप्त हाेताच ताे तातडीने खरेदी केंद्रांवर पाठविला जाईल.
- आर. व्ही. तराळे, जिल्हा विपणन अधिकारी,
महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महामंडळ.