दर्जेदार वैद्यकीय शिक्षकांची कमतरता : एम्सचे अध्यक्ष दवे यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:19 AM2019-01-16T01:19:38+5:302019-01-16T01:21:24+5:30
भारतात ‘एम्स’ची संख्या वाढत आहे. ‘एम्स’ वर कौशल्यप्राप्त व दर्जेदार डॉक्टर तयार करण्याची जबाबदारी आहे. परंतु देशात दर्जेदार वैद्यकीय शिक्षकांची कमतरता आहे, अशी खंत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थचे (एम्स) अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले डॉ. पी. के. दवे यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात ‘एम्स’ची संख्या वाढत आहे. ‘एम्स’ वर कौशल्यप्राप्त व दर्जेदार डॉक्टर तयार करण्याची जबाबदारी आहे. परंतु देशात दर्जेदार वैद्यकीय शिक्षकांची कमतरता आहे, अशी खंत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थचे (एम्स) अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले डॉ. पी. के. दवे यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केली.
डॉ. दवे यांनी मंगळवारी मिहानमध्ये सुरू असलेल्या एम्सच्या बांधकामाचे व मेडिकलमध्ये सुरू असलेल्या एम्सच्या एमबीबीएस वर्गाचे निरीक्षण केले. मूळचे गुजरात येथील डॉ. दवे एम्स दिल्लीचे विद्यार्थी आहेत. एम्स दिल्लीच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आर्थाेपेडिक सर्जन असलेले डॉ. दवे यांच्याकडे आता नागपूर एम्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निमित्त ते नागपुरात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी एम्सच्या संचालक डॉ. विभा दत्ता व उपसंचालक मनोजकुमार बक्षी उपस्थित होते.
रुग्णालायाच्या इमारतीच्या ‘कन्सेप्ट’मध्ये बदल
डॉ. देव म्हणाले, पूर्वीच्या आणि आत्ताच्या रुग्णालयाच्या इमारतीच्या ‘कन्सेप्ट’ म्हणजेच संकल्पनेत बदल झाला आहे. आता रुग्णालयात अपघाताचा किंवा सामान्य रोगाचा रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार कुठे होतील, लिफ्ट कुठे असावी, ‘रॅम्प’ या सर्व बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. नागपूर ‘एम्स’च्या बांधकामातही यासर्व गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
आरोग्य सेवेच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाचे
आरोग्य सेवेच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय महत्त्वाचे असते. लोकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. परंतु तज्ज्ञ डॉक्टर व सोयींअभावी रुग्ण शहरात येऊन शासकीय रुग्णालयात गर्दी करतात. यामुळे अनेकवेळा रुग्णसेवा विस्कळीत होते. म्हणूनच प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करणे, नागरिकांना आरोग्यविषयक धडे देणे आवश्यक आहे. सरकारने यात लक्ष घालणे आवश्यक असल्याचे असे मतही डॉ. दवे यांनी व्यक्त केले.