अळीमुळे हरभऱ्याचे पीक धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:12 AM2020-12-05T04:12:57+5:302020-12-05T04:12:57+5:30
नांद : सततच्या ढगाळ वातावरणामुळे नांद (ता. भिवापूर) परिसरातील हरभऱ्याच्या पिकावर माेठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक धाेक्यात आले ...
नांद : सततच्या ढगाळ वातावरणामुळे नांद (ता. भिवापूर) परिसरातील हरभऱ्याच्या पिकावर माेठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक धाेक्यात आले आहे. अळीच्या नियंत्रणासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने ती खरेदी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
यावर्षी साेयाबीनचे पीक हातचे गेल्याने नांद परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकावर लक्ष केंद्रित केले. भिवापूर तालुक्यातील नांद, पांजरेपार, भगवानपूर, खाेलदाेडा, धामणगाव, वणी, आलेसूर, बेसूर या शिवारात काही शेतातील हरभऱ्याच्या पिकावर मर व मूळकूज या बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव झाल्याचे याआधी दिसून आले. ज्या शेतात या दाेन्ही राेगाचा फारसा प्रादुर्भाव नाही, त्या शेतातील हरभऱ्याच्या पिकावर माेठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती शेतकऱ्यांसह कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.
ही अळी झाडाच्या शेंड्यासह पाने खात असल्याने हरभऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता बळावली आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी या भागातील काही शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. साध्या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे ही अळी नियंत्रणात येत नसल्याचेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी विभागाने या अळीच्या नियंत्रणासाठी तातडीने मार्गदर्शन करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
---
कीटकनाशके अनुदानावर द्या
दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच हरभऱ्याच्या पिकावर मर व मुळकूज या राेगासह अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. राेग व अळीच्या तावडीतून पिकाला वाचविण्यासाठी महागडी बुरशीनाशके व कीटकनाशकांची फवारणी करणे अनिवार्य आहे. ती खरेदी करणे आवाक्याबाहेर असल्याने शासनाने ती अनुदानावर पुरवावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. दुसरीकडे, यावर्षी हरभऱ्याचा उत्पादनखर्च वाढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.