लॉकडाऊनमुळे नागपुरातील अनेक वकील आर्थिक अडचणीत : कमाई बंद झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:45 PM2020-04-14T23:45:04+5:302020-04-14T23:46:43+5:30
दैनंदिन कमाईवर अवलंबून असणारे अनेक वकील लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी, कुटुंबाच्या पालनपोषणाचा व अन्य खर्च भागविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दैनंदिन कमाईवर अवलंबून असणारे अनेक वकील लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी, कुटुंबाच्या पालनपोषणाचा व अन्य खर्च भागविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
शहरातील मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ, जिल्हा व सत्र न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, ग्राहक तक्रार निवारण मंच, औद्योगिक व कामगार न्यायालय, कुटुंब न्यायालय इत्यादी ठिकाणी अनेक वकील किरकोळ कामे करून आवश्यक गरजा भागविण्यापुरती कमाई करतात. त्यांना कधी मनासारखे पैसे मिळतात तर, कधी निराशा पदरी पडते. त्यात वकिली व्यवसायात जम बसला नाही अशा ज्येष्ठ वकिलांपासून ते नवोदित वकिलांचा समावेश आहे. यातील बरेच वकील बाहेरगावचे असून ते करिअर घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगून नागपुरात आले आहेत. या वकिलांना लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
लॉकडाऊनमुळे न्यायालयांमध्ये सध्या केवळ तातडीची सुनावणी आवश्यक असलेलीच प्रकरणे ऐकली जात आहेत. परिणामी, उच्च न्यायालय व अन्य कनिष्ठ फौजदारी न्यायालयांमधील कामकाज ९० टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाले असून इतर न्यायालयांतील न्यायिक कामकाज अपवाद वगळता बंद आहे. कारण, उच्च न्यायालय व अन्य कनिष्ठ फौजदारी न्यायालये वगळता अन्य न्यायालयांमध्ये अशी प्रकरणे क्वचितच असतात. त्याचा मोठा फटका दैनंदिन कमाईवर अवलंबून असलेल्या वकिलांना बसला आहे. या परिस्थितीत त्यांचे जीवन तारेवरची कसरत झाले आहे.
डीबीएचा मदतीसाठी पुढाकार
जिल्हा विधिज्ञ संघटना (डीबीए) अडचणीतील वकिलांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. संघटनेने दानदात्या वकिलांकडून निधी गोळा केला आहे. त्यातून २०० वकिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी २००० रुपये जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत ७५ वकिलांना ही आर्थिक मदत करण्यात आली आहे. अन्य गरजू वकिलांची यादी तयार केली जात आहे. संघटनेचे अध्यक्ष कमल सतुजा यांनी ही माहिती दिली.