स्कूल फी न भरल्यामुळे, शाळांनी पाठविल्या टीसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:11+5:302021-06-04T04:07:11+5:30
नागपूर : शाळेच्या मनमानी फी वसुलीमुळे राज्यभरात पालकांचे आंदोलन वाढत आहे. शाळा प्रशासन आणि पालक संघटनांमध्ये संघर्ष दिवसेंदिवस वाढत ...
नागपूर : शाळेच्या मनमानी फी वसुलीमुळे राज्यभरात पालकांचे आंदोलन वाढत आहे. शाळा प्रशासन आणि पालक संघटनांमध्ये संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना, शहरातील काही नामांकित शाळांनी स्कूल फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या टीसी पालकांच्या घरीच पाठविल्या आहेत. त्यामुळे पालक चांगलेच संतप्त झाले असून, कोरोना महामारीच्या काळात शाळा प्रशासनाकडून पालकांची होत असलेली पिळवणूक थांबविण्यासाठी जागरूक पालक परिषदेने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिक्षणाधिकाऱ्यांनी संघटनेला गुरुवारी सकाळी ११ वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयात बैठकीसाठी बोलाविले. पालक बैठकीसाठी पोहचल्यानंतर अधिकारीच आले नसल्यामुळे पालकांनी उपसंचालक कार्यालयातच ठिय्या दिला.
सकाळी पालक शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोहचले. पण अधिकारी नसल्याने ते चांगलेच संतापले. पालकांचा रोष बघून पोलिसांचे पथक कार्यालयात दाखल झाले. पोलिसांनी पालकांचे व शिक्षणाधिकाऱ्यांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. पण शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले की, अशी बैठक बोलाविलीच नव्हती. पालकांकडे शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल, यासंदर्भात व्हिडिओ रेकॉर्डिंग होती. शिक्षणाधिकारी बैठकीसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत पालकांचा रोष आणखी वाढला होता. अधिकारी येऊन तोडगा काढत नाही, तोपर्यंत कार्यालयातच ठिय्या देणार, असा निर्धार पालकांनी केला होता.
अखेर शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार या कार्यालयात पोहचल्या. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. जवळपास तीन तास पालकांचा ठिय्या कार्यालयात होता. अखेर शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी कार्यालयात पोहचले. त्यांनी पालकांना शाळेवर कारवाई करतो व टीसीही परत घ्यायला लावतो, असे लेखी दिल्यानंतरच पालकांनी कार्यालय सोडले. पालकांच्या शिष्टमंडळात गिरीश पांडे, अमित होशिंग, अमोल फाये, अर्चना देशपांडे, स्वरेशा दमके, प्रवीण कांबळे, भवानी चौबे, अभिषेक सिंह, प्रमोद अग्रवाल आदी उपस्थित होते.