पचमढी यात्रेमुळे एसटीला ४५ लाखांचे उत्पन्न
By admin | Published: September 13, 2015 03:05 AM2015-09-13T03:05:37+5:302015-09-13T03:05:37+5:30
पचमढी यात्रा एस. टी. महामंडळाला चांगलीच लाभदायी ठरली. केवळ १२ दिवसात महामंडळाच्या बसेसने ...
१२ दिवसातील कमाई : ३९६ फेऱ्या होत्या सुरू
दयानंद पाईकराव नागपूर
पचमढी यात्रा एस. टी. महामंडळाला चांगलीच लाभदायी ठरली. केवळ १२ दिवसात महामंडळाच्या बसेसने १६ हजार ४६७ प्रवाशांनी प्रवास केल्यामुळे तब्बल ४५ लाख १८ हजार ६१२ रुपयांचा महसूल पदरात पडला आहे.
पचमढी येथील महादेवाच्या यात्रेसाठी दरवर्षी नागपूर जिल्ह्यासह विदर्भातून भाविक जातात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दरवर्षी एस. टी. महामंडळाच्यावतीने ज्यादा बसगाड्या सोडण्यात येतात. या वर्षी महामंडळाने पचमढी मार्गावर १२ दिवसात एकूण ३९६ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला. महामंडळाने घेतलेल्या निर्णयाला प्रवाशांनीही भरभरून प्रतिसाद दिला. या मार्गावर महामंडळाने एकूण १ लाख ५ हजार ३३६ किलोमीटर बसेस चालवून तब्बल ४५ लाख १८ हजार ६१२ रुपयांचा महसूल मिळविला आहे. मागील वर्षी महामंडळाने याच मार्गावर एकूण २८० बसेस चालवून ३१ लाख ७२ हजार ५४४ रुपये उत्पन्न मिळविले होते. मागील वर्षाच्या तुलनेत महामंडळाने या वर्षी तब्बल ११६ बसेस अधिक चालविल्या. मागील वर्षी प्रवाशांची संख्या एका बसमागे ९२ टक्के होती. परंतू यावर्षी महामंडळाने ११६ बसेस जास्त सोडल्यामुळे प्रवाशांची संख्या प्रत्येक बसमागे ८६ टक्के झाली आणि प्रवाशांना आरामात प्रवास करणे शक्य झाले. यामुळे महामंडळाच्या तिजोरीत ४५ लाखाची भर पडल्यामुळे महामंडळावर महादेवाचीच कृपा झाली आहे.(प्रतिनिधी)