नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संघाच्या कार्याचा गौरव असल्याने वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:59 AM2019-07-10T05:59:06+5:302019-07-10T06:00:01+5:30
प्रशासनाचे मौन : कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर/मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात देश उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रात धडे शिकविण्यात येणार आहे. त्यावरून वाद उफाळला आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी याला जोरदार विरोध दर्शविला. काही संघटनांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना निवेदन देऊन इशाराही दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टिष्ट्वटरवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माण कार्यात भूमिका हे शिकविताना, आरएसएसने १९४२ च्या चले जाव आंदोलनाचा विरोध केला होता. भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाचा विरोध केला होता, हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले की, ज्यांनी इंग्रजांची साथ दिली, स्वातंत्र्य संग्रामात गद्दारी केली, ज्यांच्या विचारामुळे महात्मा गांधींची हत्या झाली, त्यांचा इतिहास आता शिकविला जाणार आहे.
कुलगुरू डॉ. काणे व अन्य पदाधिकाऱ्यांनी यावर कुठलेच भाष्य केलेले नाही.
एमए इतिहासाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात शिकविले जात आहे. एमएच्या चौथ्या सत्रात आधुनिक विदर्भाचा इतिहास या विषयाच्या चौथ्या युनिटमध्ये संघाचा मुद्दा आहे. पदवी विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी म्हणून बीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. यात कुठलेही राजकारण नाही, असे मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शर्मा यांनी सांगितले.
देश निर्माणात ‘आरएसएस’चे स्थान...
काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी मंजुरी दिली होती. अभ्यासक्रमात कम्युनिझम उदय व विकास, क्रिप्स मिशन व कॅबिनेट मिशन प्लॅन यांचा समावेश करण्यात येणार होता. मात्र, अभ्यासक्रमात बदल करताना कम्युनिझमऐवजी ‘देश निर्माणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थान’, या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण अभ्यासक्रमातून कम्युनिझमचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे.
अन्य संघटनांनीही केला विरोध
शिवाजी विद्यार्थी संघ, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनीही निवदेनाद्वारे तीव्र विरोध दर्शवित कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नागपूर विद्यापीठ बीए भाग-२ च्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रनिर्माणातील भूमिका' शिकवली जाणार आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) July 9, 2019
त्यामध्ये #RSS ने १९४२ च्या चलेजाव आंदोलनाला केलेला विरोध, भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाला केलेला विरोधही विद्यार्थ्यांना सांगावा, अशी आमची मागणी आहे.
संघाचा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय?
ब्रिटीशांबरोबर संगनमत करून स्वातंत्र्य संग्रामाचा केलेला विरोध, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यापासून इच्छुक स्वयंसेवकांना परावृत्त करणे, १९४२ चे चलेजाव आंदोलन हाणून पाडण्याकरता ब्रिटीशांना केलेली मदत, हे संघाच्या देशविरोधी कारवायांचे प्रतिक आहेत. संविधानाऐवजी मनुस्मृती ग्रंथाचा केलेला पुरस्कार, भारतीय तिरंगा झेंड्याला अशुभ म्हणून ५२ वर्षे स्वत:च्या कार्यालयावर न फडकवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य राहिलेले आहे.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस