नागपुरातील खासगी डॉक्टरांच्या संपाचा रुग्णांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:55 PM2019-06-17T22:55:02+5:302019-06-17T23:06:54+5:30

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ व डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणीसाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) पुकारलेल्या संपाचा फटका सोमवारी रुग्णांना बसला. खासगी इस्पितळांचा ‘ओपीडी’, क्ष-किरण विभाग, पॅथालॉजी लॅब २४ तास बंद ठेवण्यात आल्याने रुग्ण अडचणीत आले होते. तर मेयो, मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी याच मागणीला रेटून धरत सोमवारी काळ्या फिती लावून, डोक्याला पांढरी पट्टी बांधून तर कुणी हेल्मेट घालून रुग्णसेवा देऊन लक्ष वेधले.

Due to private doctor's strike in nagpur patients service got affected | नागपुरातील खासगी डॉक्टरांच्या संपाचा रुग्णांना फटका

नागपुरातील खासगी डॉक्टरांच्या संपाचा रुग्णांना फटका

Next
ठळक मुद्दे‘आयएमए’ने वेधले लक्ष : मेयो, मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून दिली रुग्णसेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ व डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणीसाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) पुकारलेल्या संपाचा फटका सोमवारी रुग्णांना बसला. खासगी इस्पितळांचा ‘ओपीडी’, क्ष-किरण विभाग, पॅथालॉजी लॅब २४ तास बंद ठेवण्यात आल्याने रुग्ण अडचणीत आले होते. तर मेयो, मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी याच मागणीला रेटून धरत सोमवारी काळ्या फिती लावून, डोक्याला पांढरी पट्टी बांधून तर कुणी हेल्मेट घालून रुग्णसेवा देऊन लक्ष वेधले.
तरुण डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचे लोण आता नागपुरातही पसरले आहे. शुक्रवारी मेयो, मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करून लक्ष वेधले. ‘आयएमए’ नागपूरनेही या आंदोलनाला पाठिंबा देत, केंद्रीय कायदा करून आरोग्य रक्षकाचे रक्षण करा, या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. सोबतच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व खासगी डॉक्टरांना सोमवारी सकाळी ६ पासून ते मंंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत इस्पितळाचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. यामुळे शहरासोबतच बाहेरगावावरून खासगी इस्पितळाच्या ‘ओपीडी’मध्ये आलेल्या रुग्णांना विना उपचार घरी परतावे लागले. या संपातून अपघात विभाग वगळण्यात आले होते. यामुळे केवळ गंभीर रुग्णांवरच उपचार होऊ शकले. विशेष म्हणजे, अनेक मोठी इस्पितळे पहिल्यांदाच या संपात सहभागी झाल्याने मोठा फटका रुग्णांना सहन करावा लागला. 


‘आयएमए’मध्ये डॉक्टरांची गर्दी
संपाला घेऊन ‘आयएमए’ने सोमवारी सकाळी १० वाजता खासगी इस्पितळांच्या डॉक्टरांची बैठक बोलावली होती. यावेळी मोठ्या संख्येत डॉक्टर उपस्थित होते. अनेकांनी हल्ल्याचा निषेध नोंदवीत आपले विचार मांडले. बैठकीला ‘आयएमए’ नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी, डॉ. यशवंत देशपांडे, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. कृष्णा पराते, डॉ. संजय देशपांडे, डॉ. प्रकाश देव, डॉ. अविनाश वासे, डॉ. आशिष दिसावल, डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. राजेश बल्लाळ, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. विनोद सुखीजा, डॉ. वीरल शाह, डॉ. महेश तुराळे, डॉ. अनुप मरार, डॉ. शंकर खोब्रागडे यांच्यासह शहरातील बहुसंख्य डॉक्टर उपस्थित होते.
बहुसंख्य खासगी इस्पितळांनी ‘ओपीडी’समोर ‘बंद’चे फलक लावले होते. रुग्णालयाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक ‘संपा’ची माहिती देऊन ओपीडी बंद असल्याचे सांगत होते. यामुळे शहरासोबतच ग्रामीण भागातून व इतर राज्यातून आलेल्या रुग्णांना उपचारासाठी मेयो, मेडिकल गाठावे लागले, तर काही रुग्ण विना उपचार घरी परतले. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्ण गंभीर असल्याचे सांगून खासगी इस्पितळाच्या अपघात विभागातून उपचार घेतल्याचीही माहिती आहे.
डोक्याला पांढरी पट्टी बांधून दिली रुग्णसेवा
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा अस्तित्वात यावा, या व इतरही मागण्यांसाठी मेयो व मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी डोक्याला पांढरी पट्टी व काळ्या फिती लावून रुग्णसेवा दिली. पुढील सात दिवस हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे या दोन्ही रुग्णालयाच्या ‘मार्ड’ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या काळ्या फितीला घेऊन अनेक रुग्णांनी प्रश्न विचारले. डॉक्टरांनाही त्यांना कोलकाताचे प्रकरण सांगून निषेध म्हणून आंदोलन करीत असल्याचे सांगितले.

चक्क हेल्मेट घालून दिले उपचार 

शासकीय रुग्णालयांमधील वाढत्या हल्ल्यांमुळे डॉक्टर सुरक्षित नाही, याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) काही निवासी डॉक्टरांनी चक्क हेल्मेट घालून रुग्णांवर उपचार केले. डॉक्टरांच्या या ‘हेल्मेट’ आंदोलनाची रुग्णासोबतच शहरातही दिवसभर चर्चा होती.

मेयोच्या वरिष्ठ डॉक्टरांचाही आंदोलनाला पाठिंबा 

मेयोच्या निवासी डॉक्टरांनी सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सर्जिकल कॉम्प्लेक्ससमोर आपल्या मागण्यांना घेऊन नारे-निदर्शने केली. यामध्ये रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांना सहभागी होण्याचे आवाहन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने केली होती. त्यानुसार मेयोच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांनी आंदोलनात सहभागी होत नारेबाजीही केली.

संपाला आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी डॉक्टरांचा पाठिंबा
खासगी डॉक्टरांच्या या आंदोलनाला वैद्य विनय वेलणकर, केंद्रीय अध्यक्ष वैद्य संतोष नेवपूरकर, केंद्रीय उपाध्यक्ष वैद्य सुविनय दामले, वैद्य रजनी गोखले, केंद्रीय कार्यवाह वैद्य विलास जाधव आदींसह आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी डॉक्टरांनीही पाठिंबा दिला. काळ्या फिती लावून त्यांनीही रुग्णसेवा दिली.

तर २४ जूनपासून बेमुदत संप
केंद्रीय संरक्षण कायदा, उच्च न्यायालय व ‘एमसीआय’च्या निकषानुसार निवासी डॉक्टरांसाठी ‘ड्युटी रोस्टर’, आरोग्य भत्ता, देशभरात एकच ‘सेंट्रल रेसिडेन्सी स्कीम’, विविध राज्यातील बंधपत्र योजना रद्द करा, ‘ब्रीज कोर्सेस’ रद्द करा, वैद्यकीय शिक्षणाचे खासगीकरण थांबवा, जुलैपासून शिष्यवृत्तीत वाढ करा, महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्था कडक करा, आदी मागण्यांना घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले. २३ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २४ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा मार्डच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे, सरचिटणीस डॉ. आशुतोष जाधव, डॉ. विजय राठोड, मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे व मेयो मार्डचे अध्यक्ष विजेंद्र कदम यांनी दिला आहे.

Web Title: Due to private doctor's strike in nagpur patients service got affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.