नागपुरात दीक्षाभूमीवर अनुयायांची अभिवादनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 09:31 PM2018-04-14T21:31:38+5:302018-04-14T21:42:47+5:30
दीक्षाभूमी आणि संविधान चौकात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी जमली होती. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीवर पोहचत होते. सायंकाळी हा परिसर नागरिकांनी फुलला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानसागर. महामानव, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रकांड पंडित, कायदेतज्ज्ञ, आधुनिक भारताचे निर्माते, थोर राजनीतिज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेली त्यांची कीर्ती स्वकर्तृत्वाने त्यांनी सिद्धही केली. मात्र त्याहीपेक्षा दीन, दलित, शोषित, वंचित समाजावर अपार प्रेम करणारे ते महाकारुणिक होते. जातिव्यवस्थेचे विष पिण्यासह त्यांनी वैयक्तिक आयुष्यातही अनेक आघात सोसले. मात्र याची वैयक्तिक कटुता किंवा द्वेष कधी बाळगला नाही. त्याऐवजी हा कोट्यवधीचा समाज हालअपेष्टा सहन करतो, त्याला या अन्यायातून बाहेर काढण्याचा कळवळाच त्यांना अधिक होता. शोषितांना जातिव्यवस्थेच्या अन्यायातून बाहेर काढण्यासाठी ज्वालामुखीसारखा लढणारा, तरीही हळव्या मनाचा हा महामानव बुद्धाच्या कारु ण्यसागरात विसावला. म्हणूनच समाजावर ‘मायपित्याहून उदंड माया’ करणारे ते बाबासाहेब झाले. कवी वामनदादा कर्डकांनी ‘चांदण्याची छाया, कापराची काया...माऊलीची माया होता माझा भीमराया...’ असे त्यांचे बोलके वर्णन केले.
अशी अपार करुणा, मानवता असलेल्या महामानवाला त्यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त लोखों अनुयायांनी अभिवादन केले. दीक्षाभूमी आणि संविधान चौकात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी जमली होती. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीवर पोहचत होते. सायंकाळी हा परिसर नागरिकांनी फुलला होता. सायंकाळी पावसाने थोडी तारांबळ उडाली खरी, मात्र पाऊस थांबताच पुन्हा अभिवादनासाठी रांग लागली. रोषणाईने सजलेल्या दीक्षाभूमीचा परिसर बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्याने अधिकच मनोरम झाला झाला होता. पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेले
आबालवृद्ध कुटुंबासह येथे पोहचले होते. तरुणांचा समावेश अधिकच होता आणि नेहमीप्रमाणे पुस्तकांची दुकानेही सजली होती. कुणी आकर्षक रोषणानाईने सजलेल्या दीक्षाभूमीसह मोबाईलवर सेल्फी काढून आठवण जपत होते तर निळे फेटे घातलेले तरुण अभिमानाने मिरवतही होते. मात्र बुद्धाला व बाबासाहेबांना नतमस्तक होताना डोळे मिटून ध्यानमग्न झालेले प्रत्येकाचे चेहरे त्या महामानवाच्या प्रेरणेची साक्ष देत होते. हे पाहताना पुन्हा पुन्हा वामनदादांच्या ओळी आठवत होत्या, ‘भीमराया घे तुला या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना...’